बँकेत ग्राहकांची प्रचंड गर्दी
By Admin | Updated: November 11, 2015 00:50 IST2015-11-11T00:50:45+5:302015-11-11T00:50:45+5:30
दिवाळी सणानिमित्त राज्य शासनाच्या सर्व विभागाने कर्मचाऱ्यांना १० हजार रूपयांचा अग्रीम मंजूर केला.

बँकेत ग्राहकांची प्रचंड गर्दी
एटीएमवरही रांगा : सर्वच राष्ट्रीयकृत बँका ग्राहकांनी फुल्ल
आरमोरी : दिवाळी सणानिमित्त राज्य शासनाच्या सर्व विभागाने कर्मचाऱ्यांना १० हजार रूपयांचा अग्रीम मंजूर केला. दिवाळीची खरेदी करण्यासाठी नागरिकांच्या हातामध्ये पैसा आवश्यक आहे. दिवाळी सणाच्या पर्वावर बँकेमार्फत आर्थिक व्यवहार करण्यासाठी गेल्या तीन-चार दिवसांपासून आरमोरी शहरासह जिल्हाभरातील राष्ट्रीयकृत तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखांमध्ये ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली होती.
दिवाळीनिमित्त सर्व राष्ट्रीयकृत व खासगी बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बुधवारी आणि गुरूवारी सुटी देण्यात आली आहे. शुक्रवारी पुन्हा बँका सुरू राहणार असून शनिवारी व रविवारी या दोन दिवशी पुन्हा बँका कुलूपबंद राहणार आहेत. त्यामुळे चार दिवस बँकांमार्फत होणारे व्यवहार पूर्णत: बंद राहणार आहेत.
दिवाळी सणाच्या पर्वावर साहित्य खरेदी व इतर दैनंदिन व्यवहार करण्यासाठी शेतकरी, कर्मचारी तसेच व्यापारी वर्गांनी सोमवारी व मंगळवारी जिल्ह्याच्या सर्व बँक शाखेत दाखल होऊन गर्दी केली होती. दरम्यान, आरमोरी व गडचिरोली शहरातील सर्वच राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ग्राहकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत होते. बँकांत गर्दी होत असल्याचे पाहून अनेक ग्राहकांनी एटीएम गाठले. मात्र तेथेही रस्त्यापर्यंंत लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. दिवाळी सणानिमित्त बँकेतील आर्थिक व्यवहार वाढल्याने बँक शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना नेहमीपेक्षा अधिक काम करावे लागले.
जिल्ह्याच्या दुर्गम व ग्रामीण भागात कार्यरत शिक्षण, आरोग्य, पंचायत, पशुसंवर्धन, महसूल आदींसह साऱ्याच विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तालुका व जिल्हा मुख्यालय गाठून बँकांमार्फत व्यवहार आटोपून घेतला. एटीएममध्येही मोठ्या प्रमाणात रकमेची उलाढाल होत असल्याने गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज शहरातील अनेक एटीएममधील रक्कम सोमवारी सायंकाळी संपली. त्यामुळे ग्राहकांना आल्यापावली परत जाऊन दुसरे एटीएम गाठावे लागले. (प्रतिनिधी)