आरोग्यातील अव्यवस्था आणखी किती बळी घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 01:23 AM2018-11-18T01:23:32+5:302018-11-18T01:24:40+5:30

गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य सेवेच्या नावाने असलेली बोंबाबोंब सर्वश्रृत आहे. शहरी भागात असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयापासून तर उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयातच योग्य उपचार मिळत नाही तर ग्रामीण-दुर्गम भागाचे काय हाल असतील याची कल्पनाही करवत नाही.

How many more chances of health disorder? | आरोग्यातील अव्यवस्था आणखी किती बळी घेणार?

आरोग्यातील अव्यवस्था आणखी किती बळी घेणार?

Next

मनोज ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य सेवेच्या नावाने असलेली बोंबाबोंब सर्वश्रृत आहे. शहरी भागात असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयापासून तर उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयातच योग्य उपचार मिळत नाही तर ग्रामीण-दुर्गम भागाचे काय हाल असतील याची कल्पनाही करवत नाही. आकांक्षित जिल्हा म्हणून केंद्र सरकारने या जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्याचा विडा उचलून आवश्यक त्या उणिवा भरून काढण्याचे ठरविले. पण ईमानदारीने आरोग्य सेवा देण्याची येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मानसिकताच दिसत नाही. परिणामी वेळेवर उपचार न मिळाल्याने दर महिन्याला अनेक जणांना प्राण गमवावे लागत आहेत.
दुर्गम भागात चांगले रस्ते नसल्यामुळे कनेक्टिव्हिटी नाही, रुग्णवाहिका जाऊ शकत नाही अशा सबबी नेहमीच सांगितल्या जातात. पण जिथे या अडचणी नाहीत त्या ठिकाणी तरी आरोग्यसेवा सुरळीत मिळत आहे का? या प्रश्नाचे उत्तर मिळविण्याचा प्रयत्न जिल्हास्थळी एसीमध्ये बसणाºया अधिकाºयांनी घेतला तर उत्तर समाधानकारक मिळणार नाही. परवा कुरखेडा-कोरची मार्गावर घडलेल्या दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना उपचाराअभावी हकनाक जीव गमवावा लागला. घरात आजाराने तडफत असलेल्या रुग्णावर उपचार करण्यासाठी गावात डॉक्टर नाही म्हणून हे युवक पुराड्यातील आरोग्य पथकाला पाचारण करण्यासाठी बाईकने गेले होते. पण दुर्दैवाने तेथून परत येताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली आणि उपचाराअभावी रात्रीच्या अंधारात तिथेच ते गतप्राण झाले.
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी आरोग्य केंद्र, उपकेंद्रांची संख्या वाढवण्याची गरज आहे. यासोबतच त्या आरोग्य केंद्रात सेवा देणाºया डॉक्टर-कर्मचाºयांमध्ये सेवाभावी वृत्तीही वाढविण्याची गरज आहे. आरोग्य केंद्र गावात आणि डॉक्टर-कर्मचारी शहरात अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आहे. त्यांनी त्याच गावात राहून सेवा देण्याचा दंडक असताना अर्धेअधिक लोक त्याचे पालन करत नाही. कारण अधिकाºयांचे त्यांच्यावर नियंत्रण नाही.
कुरखेडा तालुक्यातल्या देऊळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून पुराडा या आरोग्य पथक असलेल्या गावाचे अंतर तब्बल ४१ किलोमीटर आहे. फक्त आरोग्य केंद्रात जाण्यासाठी एवढे अंतर पार करावे लागत असेल तर वेळेवर उपचार मिळण्याची आशा करणेच व्यर्थ आहे. त्यातही रुग्णाला नेण्यासाठी वाहन नसते, वाहन असेल तर डिझेल नसते, कधी औषधीसाठा संपलेला असतो. एकूणच काय तर आरोग्य सेवेच्या नावावर निव्वळ बोंबाबोंब. दोन महिन्यांपूर्वी पुराडा येथील दोन जण सर्पदंशाने दगावले. कुरखेड्यात आणेपर्यंत विष अंगभर पसरले आणि वेळेवर उपचार मिळाले नसल्याने त्यांचा जीव गेला.
पुराड्याला स्वतंत्र आरोग्य केंद्र देण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीने ठराव करून पाठवला, पण प्रस्ताव शासनदरबारी प्रलंबित आहे. नवीन केंद्र द्यायचे म्हणजे नवीन डॉक्टर-कर्मचाºयांची पदमान्यता घ्यावी लागणार, आणि घोडे येथेच अडत आहे. राज्य सरकार नवीन पदभरती करण्यास तयार नाही. राज्यभरासाठी काय नियम लावायचा तो लावा, पण आकांक्षित जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्यासाठी तरी वेगळा नियम लावणे अपेक्षित आहे. ही बाब अधिकाºयांनी शासनाच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. आमदार पाठपुरावा करतात, पण मंत्रालयात बसणारे गलेलठ्ठ पगाराचे नोकरशहा संवेदनाहीन झाले आहेत. पालकमंत्र्यांचा प्रभाव पडू शकतो, पण त्यांनी लोकांच्या प्रश्नाशी घेणे-देणे नसल्यासारखे वागू नये.
कुरखेडा तालुक्यातल्याच सोनसरीच्या आरोग्य पथकात डॉक्टर नाही म्हणून काही दिवसांपूर्वी त्या केंद्राला गावकºयांनी कुलूप ठोकले. पण काहीही फरक पडला नाही. आज तिथे डॉक्टर तर नाहीच नाही, नर्सही दिवाळीपासून सुटीवर आहे. एकटा चतुर्थश्रेणी कर्मचारी आरोग्य प्रथक सांभाळत आहे. ही परिस्थिती एकट्या कुरखेडा तालुक्यात नाही, संपूर्ण जिल्हाभरात आहे. दक्षिण गडचिरोलीतील दुर्गम भागात याची तीव्रता जास्त आहे. पण लोकांच्या आरोग्याचे, त्यांच्या जगण्यावाचण्याचे सोयरसुतक कोणालाच नाही. वेळीच ही परिस्थिती बदलविली पाहीजे, अन्यथा येणारी परिस्थिती तुम्हाला बदलविल्याशिवाय राहणार नाही.

Web Title: How many more chances of health disorder?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य