लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : येथे चक्क भूमिहीन लोकांना पिकांच्या नुकसानीची भरपाई वाटप केल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. याशिवाय काही जणांच्या खात्यात नुकसानीच्या तुलनेत अधिक रक्कम जमा झाल्याचे उघडकीस आले आहे. नुकसानभरपाईच्या वाटपात झालेल्या गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी होत आहे.
सन २०२४-२५ मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. यानंतर पंचनामे करण्यात आले होते. शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कमदेखील मंजूर झाली होती. दरम्यान, या भरपाईचे वाटप सुरू आहे. तलाठ्यांकडून तहसील कार्यालयात आपद्ग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाच्या याद्या गेल्या, पण तेथे यादीत फेरबदल करुन भूमिहीन लोकांची नावे आपद्ग्रस्त शेतकऱ्यांच्या यादीत घुसविण्यात आली.
रक्कम वसुलीसाठी बजावल्या नोटीसकाही शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानीच्या तुलनेत अधिक रक्कम जमा झाली. फेरतपासणीत ही बाब उघडकीस आल्यावर तहसीलदारांनी आता अतिप्रदान रक्कम शासन खात्यात जमा करावी, अशी नोटीस संबंधितास बजावली आहे. यावरून नुकसानभरपाई रक्कम वाटपात घोळ झाल्याचे स्पष्ट होत आहे. याद्वारे भलत्याच लोकांच्या खात्यात भरपाईची रक्कम जमा झाली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी व या घोटाळ्याचा उलगडा करुन दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बापू कासेट्टी यांनी केली आहे.