घरकूल रखडले

By Admin | Updated: March 30, 2015 01:32 IST2015-03-30T01:32:12+5:302015-03-30T01:32:12+5:30

इंदिरा आवास योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात २०१४-१५ या आर्थिक वर्षात सुमारे सात हजार ४८४ घरकूल मंजूर करण्यात आले आहेत.

The house is stuck | घरकूल रखडले

घरकूल रखडले

गडचिरोली : इंदिरा आवास योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात २०१४-१५ या आर्थिक वर्षात सुमारे सात हजार ४८४ घरकूल मंजूर करण्यात आले आहेत. आर्थिक वर्ष संपण्याच्या मार्गावर असतानाही केवळ ६६ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून केवळ २१ लाभार्थ्यांना तिसरा हप्ता वितरित करण्यात आला आहे.
वाढत्या महागाईमध्ये सामान्य नागरिकांना घराचे स्वप्न पूर्ण करणे शक्य होत नाही. परिणामी कित्येक नागरिकांना झोपडीतच आपले आयुष्य घालवावे लागते. तर काही नागरिकांना उघड्यावरच संसार थाटावा लागतो. यापासून नागरिकांची मुक्तता होऊन प्रत्येकाला स्वत:चे घर बांधता यावे, यासाठी केंद्र शासनाने इंदिरा आवास योजना सुरू केली. या योजनेंतर्गत लाभार्थ्याला एक लाख रूपयांचे अनुदान दिले जाते.
घरकुलाची रक्कम तीन हप्त्यात दिली जाते. घरकूल मंजूर झाल्याबरोबर पहिला हप्ता वितरित केला जातो. पहिल्या हप्त्याच्या पैशाचा वापर करून जवळपास पाच फुटापर्यंत घराचे बांधकाम झाल्यानंतर दुसरा हप्ता दिल्या जातो व घर पूर्ण झाल्यानंतर तिसरा हप्ता वितरित केला जातो. यापध्दतीनुसार आजपर्यंत सात हजार ३३८ लाभार्थ्यांना पहिला हप्ता, एक हजार ३३५ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता व केवळ २१ लाभार्थ्यांना तिसरा हप्ता वितरित करण्यात आला आहे. अनेक लाभार्थ्यांनी स्वत: जवळचे पैसे वापरून घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे. मात्र तिसरा हप्ता मिळत नसल्याने लाभार्थी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. तिसरा हप्ता देण्यात यावा, याबाबत लाभार्थी अनेकवेळा पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे खेटे मारत आहेत. तरीही प्रशासन मात्र हलण्यास तयार नाही. त्यामुळे घरकूल लाभार्थी त्रस्त झाले आहेत. (नगर प्रतिनिधी)

Web Title: The house is stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.