ग्रामसभेसाठी सभागृह पडले अपुरे
By Admin | Updated: June 12, 2016 01:19 IST2016-06-12T01:19:14+5:302016-06-12T01:19:14+5:30
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखाली नसणाऱ्या कुटुंबाना शासकीय घरकूल योजनेसाठी लाभार्थ्याची निवड करण्याकरिता ८ जून रोजी वैरागड येथे विशेष ग्रामसभा बोलविण्यात आली.

ग्रामसभेसाठी सभागृह पडले अपुरे
गोंधळ उडाला : घरकूल योजनेसाठी लाभार्थी निवड करायचे होते
वैरागड : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखाली नसणाऱ्या कुटुंबाना शासकीय घरकूल योजनेसाठी लाभार्थ्याची निवड करण्याकरिता ८ जून रोजी वैरागड येथे विशेष ग्रामसभा बोलविण्यात आली. या ग्रामसभेला गावकऱ्यांची मोठी गर्दी झाल्याने सभागृह अपुरे पडले. पात्र लाभार्थ्यांची निवड करताना गोंधळ झाल्याने विषयावर चर्चा न होताच गोंधळात ग्रामसभा आटोपती घ्यावी लागली.
शासकीय घरकूल योजनेतून अनुसूचित जाती आणि जमातीच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना जवळपास १०० टक्के घरकूल योजनेचा लाभ मिळाला आहे. केंद्र शासनाच्या ग्राम उदय से भारत उदय या कार्यक्रमांतर्गत घरकूल लाभार्थ्यांना, शासकीय सेवेत नोकरी असणाऱ्यांना वार्षिक आर्थिक उत्पन्न जास्त असणाऱ्या कुटुंबांना वगळून कोणत्याही प्रवर्गातील कुटुंबाला टप्प्याटप्प्यात शासकीय घरकूल योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी वैरागड येथे विशेष ग्रामसभा बोलाविण्यात आली होती. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आलेल्या अर्जाचा ग्रामविकास अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा वाचन करून दाखविले. आणि ज्या अर्जावर आक्षेप घ्यायचे असेल त्यावर उपस्थितांनी आक्षेप घ्यावा, असे सुचविल्यानंतर गोंधळास सुरूवात झाली. घरकूल लाभार्थ्याचे अर्ज प्राप्त झाले. त्या अर्जाचे वाचन करून निकष योग्य असतील तर त्या अर्जाचा प्रथम विचार करून उर्वरित अर्ज प्रतीक्षा यादीत ठेवावे, अशी सूचना केली. पण ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून विषय योग्यरितीने मांडल्या न गेल्याने सभेत गोंधळ उडाला. (वार्ताहर)