रूग्णालयाची दुरूस्ती रखडली

By Admin | Updated: April 20, 2016 01:39 IST2016-04-20T01:39:25+5:302016-04-20T01:39:25+5:30

येथील उपजिल्हा रूग्णालयाच्या इमारतीचा स्वरचना आराखडा आरोग्य तसेच बांधकाम विभागाकडे उपलब्ध नाही.

The hospital's repair has been restored | रूग्णालयाची दुरूस्ती रखडली

रूग्णालयाची दुरूस्ती रखडली

कुरखेडा रूग्णालयाची दैनावस्था : स्वरचना आराखडा नकाशा गायब
कुरखेडा : येथील उपजिल्हा रूग्णालयाच्या इमारतीचा स्वरचना आराखडा आरोग्य तसेच बांधकाम विभागाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे मागील १२ वर्षांपासून या इमारतीची दुरूस्ती, रंगरंगोटीचे काम रखडले आहे.
महाराष्ट्र आरोग्य सेवा विकास प्रकल्पाच्या वतीने २००० ते २००४ या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी येथे ग्रामीण रूग्णालय तसेच कुरखेडा, आरमोरी व अहेरी येथे उपजिल्हा रूग्णालयांच्या इमारतींचे बांधकाम करण्यात आले. पुढे हा प्रकल्प गुंडाळण्यात आला. प्रकल्पाद्वारे बांधलेल्या इमारतीचा ताबा आरोग्य विभागाकडे देण्यात आला. नियमानुसार या इमारतीची देखभाल व दुरूस्ती करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविली जाते. मात्र प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे स्थानिक कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयाच्या इमारतीचा ताबा स्वीकारताना स्वरचना आराखडा नकाशा गहाळ झाला. नियमांवर बोट ठेवत बांधकाम विभागाने या इमारतीची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी स्वीकारलेली नाही. त्यामुळे १२ वर्षांचा कालावधी उलटूनही इमारतीची देखभाल, दुरूस्ती व रंगरंगोटी करण्यात आली नाही. रूग्णकल्याण समितीच्या सभेत याबाबत वारंवार विचारणा होत असल्याने वैद्यकीय अधीक्षक डॉ. सोयाम यांनी सर्व विभागाकडे नकाशा उपलब्धतेबाबत पाठपुरावा केला. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही.
देखभाल व दुरूस्ती रखडल्याने इमारतीची दुरवस्था झाली आहे. याचा त्रास या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच भरती होणाऱ्या रूग्णांना सहन करावा लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The hospital's repair has been restored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.