नक्षल्यांच्या मारहाणीमुळे मजूर दहशतीत
By Admin | Updated: December 25, 2016 01:45 IST2016-12-25T01:45:04+5:302016-12-25T01:45:04+5:30
एटापल्ली तालुक्याच्या सुरजागड पहाडीवर खासगी कंपनीकडून लोह खनिज प्रकल्पासाठी उत्खननाचे

नक्षल्यांच्या मारहाणीमुळे मजूर दहशतीत
परिसरातील गावामध्येही दहशत : काम बंद होण्याची शक्यता
एटापल्ली : एटापल्ली तालुक्याच्या सुरजागड पहाडीवर खासगी कंपनीकडून लोह खनिज प्रकल्पासाठी उत्खननाचे काम मागील सहा ते आठ महिन्यांपासून सुरू होते. शुक्रवारी या कामावर नक्षलवाद्यांनी हल्ला चढवून या कामावरील मजुरांना बेदम मारहाण केली व पुन्हा कामाकडे न फिरकण्याची तंबी दिली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्येही दहशत निर्माण झाली आहे.
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवर २००६ मध्ये खासगी कंपन्यांना लिज उत्खनन कामासाठी मंजूर करण्यात आली होती. परंतु मागील १० वर्षात येथे काम सुरू झाले नाही. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी या भागात काम करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याची सूचना केली. त्यानंतर या परिसरात पोलीस ठाणे निर्माण करण्यात आले व खासगी कंपनीकडून उत्खननाचे काम सुरू झाले. परिसरातील अनेक गावातून ३००, साडेतीनशे मजूर व बाहेर ठिकाणाहून वाहतुक कामासाठी ट्रक बोलाविण्यात आले होते. शुक्रवारी नक्षलवाद्यांनी ट्रक ड्रायव्हरच्या तळ हातावर वर पाठीवर बेदम मारहाण केली. यापुढे कामावर आले तर जीवानिशी ठार करू, अशी धमकी दिली, अशी माहिती काही ट्रक चालकांनी लोकमतशी बोलताना दिली. नक्षलवाद्यांच्या मारहाणीनंतर ट्रक चालक व मजूर पाच ते सहा किमी अंतर पायी चालून मुख्य रस्त्यावर आले व तेथून ते आपल्या गावी रवाना झाले. काही ट्रक चालक व मजुरांना तीन तास ओलीस ठेवूनही मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे आता सुरजागड पहाडीवरील काम बंद होण्याची शक्यता आहे. तर केंद्र सरकारने आणखी काही सुरक्षात्मक बाबी निर्माण करून दिल्या तर पुन्हा येथे काम सुरू होऊ शकते, असेही काहींचे म्हणणे आहे. सध्या तरी मात्र नक्षलवाद्यांच्या या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत पसरली आहे. शुक्रवारच्या या घटनेनंतर एटापल्ली पोलीस व जिल्हा पोलीस मुख्यालयातूनही या घटनेची चौकशी सुरू झाली आहे. या घटनेचे कारण काय, याचा शोध घेतल्या जात आहे. (तालुका प्रतिनिधी)