गृहविलगीकरणातील रुग्णांना साेडले वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:39 IST2021-05-08T04:39:07+5:302021-05-08T04:39:07+5:30
देसाईगंज तालुक्याच्या गावागावात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य ...

गृहविलगीकरणातील रुग्णांना साेडले वाऱ्यावर
देसाईगंज तालुक्याच्या गावागावात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी २६ एप्रिल रोजी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी यांच्या नावे आदेश काढले आहेत. यात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाला लक्षणानुसार कोरोना विलगीकरण कक्षात अथवा गृहविलगीकरणात ठेवण्याचा पर्याय दिला आहे.
गृहविलगीकरण दिलेल्या रुग्णांचा दैनंदिन पाठपुरावा करण्याची जबाबदारी शिक्षकांना देण्यात आली आहे. आशांनी रुग्णाला दैनंदिन भेटी देऊन पल्स ऑक्सिमीटरने शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासावे व शिक्षकांनी संबंधित आशांकडून रुग्णांची माहिती गोळा करून तालुकास्तरावर जाऊन गुगल शीट भरण्याची सक्ती केली आहे. सूचनांचे पालन न केल्यास व रुग्ण दगावल्यास संबंधित गावातील सरपंच, ग्रामसेवक व तलाठी प्रशासकीय कारवाईस पात्र राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. असे असताना आशा रुग्णाला गृहविलगीकरणात ठेवण्यात आल्यानंतर एकदाही तपासणी करण्यास येत नाही. रुग्णावर उपचार हाेत नसल्याने रुग्णांना घराबाहेर पडावे लागत आहे. परिमाणी, हे रुग्ण अनेकांच्या संपर्कात आल्यानेच संसर्ग अधिक फैलावत असल्याचे धक्कादायक वास्तव यामुळे समोर येऊ लागले आहे.
काेट
आशा वर्करना गृहविलगीकरणात असलेल्या पाॅझिटिव्ह रुग्णांचा दैनंदिन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यात जराही हयगय करणाऱ्या आशावर कारवाईसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल.
डाॅ. अभिषेक कुमरे, तालुका आराेग्य अधिकारी, देसाईगंज