गृह विलगीकरणातील कोरोनाचे रुग्ण फिरताहेत गावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:38 IST2021-04-22T04:38:20+5:302021-04-22T04:38:20+5:30
देसाईगंज तालुक्यात आजमितीस ३६० कोरोनाबाधित रुग्ण असून यांपैकी बहुतांश रुग्ण शासकीय कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहेत; तर काहींना त्यांना ...

गृह विलगीकरणातील कोरोनाचे रुग्ण फिरताहेत गावात
देसाईगंज तालुक्यात आजमितीस ३६० कोरोनाबाधित रुग्ण असून यांपैकी बहुतांश रुग्ण शासकीय कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहेत; तर काहींना त्यांना उपलब्ध असलेल्या सोयीमुळे गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, संबंधित कोरोनाबाधित रुग्णांनी १४ दिवस विलगीकरणात राहून आरोग्य तपासणी करणे अनिवार्य असून आरोग्य तपासणीत निगेटिव्ह आल्यासही काही दिवस नागरिकांच्या संपर्कात न येण्याच्या सूचनावजा निर्देश देण्यात आले आहेत. कोरोनाबाधित रुग्ण दरम्यानच्या कालावधीत बाहेर फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन आणि मुंबई पोलीस कायद्याच्या तरतुदीनुसार संचारबंदीचे कलम १८८ अंतर्गत कायदेशीर कारवाई करणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असताना गृह विलगीकरणात असलेले रुग्ण चक्क इतरही गावांत फिरून अनेकांच्या संपर्कात येत असल्याने आरोग्य यंत्रणा अधिकच अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तालुका मुख्यालयापासून पाच कि.मी. अंतरावरील विसोरा हे गाव कोरोनाचे हाॅट स्पाॅट ठरले आहे; तर कुरुड येथे आठ दिवसांत सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यांपैकी काही रुग्णांचा नेमका कशामुळे मृत्यू झाला हे अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी एकाच दिवशी दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
असे असताना गृह विलगीकरणातील कोरोनाबाधित मात्र शासनाच्या नियमांना हरताळ फासून चारचौघांत मिसळत असल्याने त्यांच्या माध्यमातून कोरोनाचा उद्रेक होऊन अनेकांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काेराेनाबाधित रुग्णांचा शोध घेऊन संचारबंदी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व फिरणाऱ्या बाधितांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात यावे, अशी मागणी हाेत आहे.