होळी यांचा अर्ज वैध
By Admin | Updated: September 30, 2014 23:35 IST2014-09-30T23:35:26+5:302014-09-30T23:35:26+5:30
भारतीय जनता पक्षाचे गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील उमेदवार डॉ. देवराव माडगुजी होळी यांच्या उमेदवारी अर्जावरील प्रलंबित सुनावणी आज मंगळवारी उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर सकाळी ११ वाजता सुरू झाली.

होळी यांचा अर्ज वैध
निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय : तब्बल एक तास चालला आक्षेपावर युक्तिवाद
गडचिरोली : भारतीय जनता पक्षाचे गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील उमेदवार डॉ. देवराव माडगुजी होळी यांच्या उमेदवारी अर्जावरील प्रलंबित सुनावणी आज मंगळवारी उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर सकाळी ११ वाजता सुरू झाली. तब्बल एक तासांच्या युक्तीवादानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पी. शिवशंकर यांनी डॉ. देवराव होळी यांचा उमेदवारी अर्ज वैध असल्याचा निर्णय दिला. त्यामुळे छाननी स्थळाजवळ जमलेल्या काँग्रेस, राकाँच्या शेकडो समर्थकांची निराशा झाली. तर भाजपने फटाके फोडून या निर्णयाचे जोरदार स्वागत केले.
भाजपकडून उमेदवारी अर्ज भरणारे डॉ. देवराव होळी हे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवेत गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. परंतु त्यांचा राजीनामा मंजुर झाल्याची माहिती जिल्हास्तरावरील आरोग्य यंत्रणेकडे नव्हती. त्यामुळे जिल्हास्तरावरील आरोग्य यंत्रणेने माहितीच्या अधिकारात दिलेल्या कागदपत्राच्या आधारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते मंडळींनी सोमवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आक्षेप घेतला होता. कालही तीन विधीज्ञांच्या उपस्थितीत डॉ. देवराव होळी यांची बाजू भारतीय जनता पक्षाच्यावतीने मांडण्यात आली. मात्र त्यानंतरही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निर्णय राखून ठेवत कायदेशीर बाबी पडताळून पाहिल्या व आज सकाळी ११ वाजता कालच्या प्रलंबित राहिलेल्या युक्तीवादाला सुरूवात झाली. यावेळी डॉ. होळी यांच्यावतीने नागपूर येथील विधीज्ञ डॉ. गणेश एन. खानझोडे, अॅड. प्रमोद बोरावार यांच्यासह चार कायदेतज्ञांनी डॉ. होळी यांची बाजू मांडली. यावर काँग्रेसच्यावतीने हसनअली गिलानी, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने युवानेते ऋतूराज हलगेकर यांनीही बाजू मांडली. या सर्व युक्तीवादाला ऐकल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी पी. शिवशंकर यांनी आपला निर्णय जाहीर केला व डॉ. होळी यांचा उमेदवारी अर्ज वैध असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे भाजपचा जीव भांड्यात पडला.