महसूल कर्मचाऱ्यांचे जिल्हा कचेरीसमोर धरणे
By Admin | Updated: April 21, 2016 01:43 IST2016-04-21T01:43:33+5:302016-04-21T01:43:33+5:30
प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्यभरातील सर्व तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केले आहे.

महसूल कर्मचाऱ्यांचे जिल्हा कचेरीसमोर धरणे
बेमुदत संपावर जाण्याचा इशारा : तलाठी, मंडळ अधिकारी सहभागी
गडचिरोली : प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्यभरातील सर्व तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणून महसूल कर्मचाऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले.
गुरूवारपासून आंदोलनाचा चौथा टप्पा सुरू होणार असून जिल्ह्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी संगणकीकृत कामकाजावर बहिष्कार टाकणार आहेत. तसेच रेकॉर्ड संबंधीचे सर्व कागदपत्रे संबंधित तहसीलदारांकडे जमा करण्यात येणार आहे. यानंतरही शासनाने महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास २६ एप्रिलपासून आंदोलनाचा शेवटचा पाचवा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान २६ एप्रिलपासून जिल्ह्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी बेमुदत संपावर जाणार आहे.
विदर्भ पटवारी संघ नागपूर शाखा गडचिरोलीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी विदर्भ पटवारी संघ गडचिरोलीचे अध्यक्ष किशोर ठाकरे, जिल्हा सचिव एकनाथ चांदेकर, सहसचिव जी. एम. कुमरे, उपाध्यक्ष पी. टी. तुलावी, एन. जे. वाते आदीसह बहुसंख्य तलाठी, मंडळ अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)