आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण
By Admin | Updated: April 11, 2016 01:33 IST2016-04-11T01:33:34+5:302016-04-11T01:33:34+5:30
स्थानिक नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती नंदू कायरकर यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्याला शनिवारी रात्री मारहाण केली.

आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण
तीन तास कामबंद आंदोलन : काँग्रेसच्या न.प. सभापतीला अटक व सुटका
गडचिरोली : स्थानिक नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती नंदू कायरकर यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्याला शनिवारी रात्री मारहाण केली. याप्रकरणी नंदू कायरकर यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी रूग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी रविवारी सकाळी ८ ते ११.३० वार्जपर्यंत काम बंद आंदोलन केले. डॉक्टर व पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले. रविवारी नंदू कायरकर यांना अटक करण्यात आली. त्यानंतर दुपारी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या तक्रारीनुसार मुल तालुक्यातील नवेगाव येथील उर्वशी शेन्डे या दोन वर्षाच्या मुलीच्या डोक्याला मार लागल्याने तीला रूग्णालयात शनिवारी रात्री आठ वाजता भरती करण्यात आले होते. मात्र तीची प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपूर येथील रूग्णालयात भरती करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यासाठी कागदपत्रांवर सही करण्याची विनंती आरोग्य कर्मचारी अमोल सुखदेव तरारे यांनी उर्वशीच्या नातेवाईकांना केली. यावेळी नंदू कायरकर यांनी तरारे यांना शिविगाळ करण्यास सुरूवात केली. त्याचबरोबर शर्टची कॉलर पकडून ढकलून दिले व पोटावर तसेच छातीवर लाथाबुक्यांनी मारहाण केली.
याबाबतची तक्रार तरारे यांनी गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. मारहाण करणाऱ्या कायरकर यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयातील सर्वच कर्मचाऱ्यांनी रूग्णालयाच्या प्रवेशसमोर येऊन काम बंद आंदोलन सुरू केले. कायरकर याना अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलक आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिला. डॉक्टरांनी मध्यस्थी करून आंदोलन मिटविण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यानंतर ठाणेदार विजय पुराणिक यांना आंदोलनस्थळी बोलविण्यात आले. त्यांनी कायरकर यांना अटक करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन दुपारी ११.३० वाजता मागे घेण्यात आले.
आंदोलनात महाराष्ट्र गोव्हरमेंट नर्सेस संघटनेच्या अध्यक्षा विना शर्मा, राज्याध्यक्षा अनुराधा आठोले, उपाध्यक्ष कविता नांदगाये, सचिव आशीष पिंपडेकर, चांदेकर, येवले, शंकर तोगरे, राज्य कर्मचारी चतुर्थ कर्मचारी, राज्य कर्मचारी संघटनेचे सचिव किशोर सोनटक्के, लतिफ खान, अखिल भारतीय सफाई मजदूर काँगे्रस कामगार संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीचे उपाध्यक्ष छगन महातो, या संटनांचे पदाधिकारी, सदस्य व जिल्हा सामान्य रूग्णालयातील सर्वच आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते. तपासानंतर पोलिसांनी नंदू कायरकर यांच्या विरोधात भादविं कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला व दुपारी अटक करून जामिनावर सुटका केली, अशी माहिती ठाणेदार विजय पुराणिक यांनी दिली. (नगर प्रतिनिधी)