उच्चशिक्षितांनी संशोधनात स्थानिक समस्यांवर भर द्यावा
By Admin | Updated: December 25, 2014 23:31 IST2014-12-25T23:31:25+5:302014-12-25T23:31:25+5:30
खऱ्या समस्या ग्रामीण भागातच आहेत़ उच्चशिक्षितांनी त्यावर संशोधन केल्यास समस्यांचे निराकरण होण्याबरोबरच संशोधनक्षम वातावरण निर्माण होऊन ग्रामीण भागाचा विकास होण्यास मदत होईल,

उच्चशिक्षितांनी संशोधनात स्थानिक समस्यांवर भर द्यावा
गडचिरोली : खऱ्या समस्या ग्रामीण भागातच आहेत़ उच्चशिक्षितांनी त्यावर संशोधन केल्यास समस्यांचे निराकरण होण्याबरोबरच संशोधनक्षम वातावरण निर्माण होऊन ग्रामीण भागाचा विकास होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन अणुशास्त्रज्ञ व राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ़ अनिल काकोडकर यांनी गुरूवारी येथील गोंडवाना विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात केले़ गोंडवाना विद्यापीठात आयोजित सुशासन कार्यक्रमात ते आज बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रणजितकुमार, प्रभारी कुलगुरु डॉ कीर्तीवर्धन दीक्षित, डॉ़ डोळस, कुलसचिव डॉ़ विनायक इरपाते, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) टी. एस. के. रेड्डी, कोठारी उपस्थित होते़ याप्रसंगी बोलताना डॉ. काकोडकर म्हणाले, दीड वषार्पूर्वी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या सहकार्याने गोंडवाना विद्यापीठात ‘सिलेज’ हा उपक्रम सुरू करण्यास आला़ शहर आणि ग्रामीण भागांचा मेळ साधून ग्रामीण भागात संशोधनास वाव द्यावा व त्यातून या भागाचा विकास करावा, अशी त्यामागील संकल्पना आहे़ ग्रामीण भागातही संशोधक आहेत़ मात्र, त्यांना शहरातील सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्यांना वाव मिळत नाही़ त्यामुळे ग्रामीण संशोधकांना वाव देऊन येथील समस्या दूर करण्याचा प्रयत्न झाल्यास या भागाचा विकास होऊन रोजगारनिर्मितीही होऊ शकेल. आजच्या तरुण पिढीला भविष्यकाळानुरुप तयार करण्यासाठी चांगल्या शिक्षणाशिवाय पर्याय नाही़ त्याअनुषंगाने विद्यापीठातील संशोधन व शिक्षणक्रम परिसरातील गरजानुरुप करणे अभिप्रेत असल्याचेही डॉ काकोडकर यांनी स्पष्ट केले़ कार्यक्रमाचे संचालन ग्रंथपाल डॉ़ रोकडे, तर डॉ़ विनायक इरपाते यांनी आभार मानले़