शैक्षणिक विकासासाठी न.प.ला मदत करणार

By Admin | Updated: February 2, 2016 01:26 IST2016-02-02T01:26:06+5:302016-02-02T01:26:06+5:30

स्थानिक नगर परिषदेच्या जवाहरलाल नेहरू रामनगर शाळेने आयएसओ नामांकन प्राप्त करून संपूर्ण देशात गडचिरोली जिल्ह्याचा नावलौकिक केला आहे.

Helping the NP for educational development | शैक्षणिक विकासासाठी न.प.ला मदत करणार

शैक्षणिक विकासासाठी न.प.ला मदत करणार

अशोक नेते यांचे आश्वासन : नगर परिषद शाळांच्या क्रीडा संमेलनाचे थाटात उद्घाटन
गडचिरोली : स्थानिक नगर परिषदेच्या जवाहरलाल नेहरू रामनगर शाळेने आयएसओ नामांकन प्राप्त करून संपूर्ण देशात गडचिरोली जिल्ह्याचा नावलौकिक केला आहे. नगर पालिकेने शहरातील शाळांचा गुणात्मक दर्जा टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे, न.प. क्षेत्रातील शैक्षणिक विकासासाठी नगर पालिका प्रशासनाला आपण सर्वतोपरी वेळोवेळी मदत करणार, असे आश्वासन खासदार अशोक नेते यांनी दिले.
स्थानिक नगर पालिकेच्या प्रांगणात प्राथमिक शाळांच्या क्रीडा संमेलनाचे उद्घाटन सोमवारी पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉ. अश्विनी यादव होत्या. प्रमुख अतिथी म्हणून न.प. उपाध्यक्ष प्रा. रमेश चौधरी, बांधकाम सभापती प्रा. राजेश कात्रटवार, शिक्षण सभापती विजय गोरडवार, पाणी पुरवठा सभापती नंदू कायरकर, नियोजन सभापती बेबी चिचघरे, महिला व बाल कल्याण सभापती शारदा दामले, उपसभापती संध्या उईके, माजी नगराध्यक्ष भुपेश कुळमेथे, माजी बांधकाम सभापती आनंद श्रुंगारपवार, माजी पाणी पुरवठा सभापती संजय मेश्राम, नगरसेवक अजय भांडेकर, पुष्पा कुमरे, मिनल चिमुरकर, रामकिरीत यादव, स्वीकृत सदस्य अ‍ॅड. नितीन कामडी, श्रीकांत भृगुवार, लिपीक बी. एम. शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. क्रीडा व कला संमेलनाच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना चालना मिळते, परिणामी विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास घडवून येतो, असेही खासदार अशोक नेते यावेळी म्हणाले.
याप्रसंगी प्रा. राजेश कात्रटवार, प्रा. रमेश चौधरी यांनी नगर पालिका प्रशासनामार्फत गडचिरोली शहरात सुरू असलेल्या १० शाळांच्या शैक्षणिक बाबींचा आढावा मांडला. सध्याच्या स्पर्धात्मक युगात गडचिरोली शहरात इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंट व शाळांची भाऊगर्दी वाढली आहे. अशा परिस्थितीत न.प. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांचा दर्जा टिकविण्यासाठी नवे उपक्रम हाती घेण्यात येतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी आयएसओ नामांकित जवाहरलाल नेहरू न.प. शाळेचे मुख्याध्यापक सुधीर गोहणे यांचा खासदार अशोक नेते यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण सभापती विजय गोरडवार, संचालन संध्या चिलमवार, अहवाल वाचन, न.प. शाळेचे मुख्याध्यापक रामभाऊ काळबांधे यांनी केले तर आभार प्रमोद भानारकर यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व १० न.प. शाळांचे शिक्षक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

१० शाळांच्या मुलामुलींचे ५० संघ संमेलनात सहभागी
स्थानिक नगर पालिकेच्या जवाहरलाल नेहरू शाळा रामनगर, रामपुरी, संत जगनाडे महाराज शाळा लाजेंडा, शिवानी प्राथमिक शाळा, राजीव गांधी शाळा हनुमान वार्ड, सावित्रीबाई फुले शाळा गोकुलनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा संकुल कॉम्प्लेक्स, वीर बाबुराव शेडमाके प्राथमिक शाळा विसापूर, महात्मा गांधी प्राथमिक शाळा व इंदिरा गांधी प्राथमिक शाळा इंदिरानगर या १० शाळांचे मुलामुलींचे प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांचे ४० संघ व माध्यमिक विभागाचे १० संघ असे एकूण कबड्डी, खो-खो स्पर्धेसाठी मुलामुलींचे एकूण ५० संघ या तीन दिवसीय क्रीडा संमेलनात सहभागी झाले आहेत. १० शाळांचे ५१ शिक्षक व १ हजार ४२२ विद्यार्थी या क्रीडा संमेलनात सहभागी झाले आहेत.
नगर पालिका शाळांच्या तीन दिवशीय क्रीडा संमेलनाचा समारोप तिसऱ्या दिवशी बुधवारला होणार आहे. यावेळी या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या संघांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व शिल्ड देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

Web Title: Helping the NP for educational development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.