हेल्पिंग हॅन्डस्च्या मदतीने त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दुणावला
By Admin | Updated: April 21, 2016 01:48 IST2016-04-21T01:48:33+5:302016-04-21T01:48:33+5:30
अहेरी येथील हेल्पिंग हॅन्डस् या संस्थेने परिसरातून जमा केलेले सुस्थितीतील जुने शैक्षणिक साहित्य फासेपारध्यांची मुले शिकत असलेल्या ....

हेल्पिंग हॅन्डस्च्या मदतीने त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दुणावला
अहेरीकरांचे दातृत्व : मंगरूळ चवाळाच्या शाळेत रंगला दान महोत्सव
अहेरी : अहेरी येथील हेल्पिंग हॅन्डस् या संस्थेने परिसरातून जमा केलेले सुस्थितीतील जुने शैक्षणिक साहित्य फासेपारध्यांची मुले शिकत असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या मंगरूळ चवाळा गावातील आश्रमशाळेत नेऊन वितरित केले. हेल्पिंग हॅन्डस्च्या या साहित्यामुळे शाळकरी मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद दुणावला. अहेरीकरांच्या या दान महोत्सवाचा सोहळा परवा मंगरूळ चवाळाच्या शाळेत रंगला.
विदर्भासह मराठवाडाच्या अनेक भागात यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. अशा स्थितीत गरजूंना मदतीचा हात द्यावा, या हेतुने हेल्पिंग हॅन्डस् या अहेरीच्या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला. अहेरीसह गडचिरोली जिल्ह्याच्या परिसरातून त्यांनी जुने व सुस्थितीत असलेले कपडे, शैक्षणिक साहित्य जमा केले. हे साहित्य गरजूपर्यंत पोहोचविण्याचा विडा हेल्पिंग हॅन्डस् संस्थेचे अध्यक्ष प्रतीक मुधोळकर यांनी उचलला. प्रतीक मुधोळकर यांच्या नेतृत्वात हेल्पिंग हॅन्डस्चे हजारो हात हे साहित्य संकलित करण्यासाठी भिडले होते. दहा दिवस हा उपक्रम राबविल्यानंतर जमलेले साहित्य श्रमसाफल्य बहुउद्देशीय संस्था घाटंजी, आधार फाऊंडेशन यवतमाळ, अस्तित्व फाऊंडेशन यवतमाळ यांच्या मदतीने दुष्काळग्रस्त भागात नेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मंगरूळ चवाळा येथील आदिवासी आश्रमशाळेत फासेपारधी या आदिवासी जमातीतील मुले शिक्षण घेतात, अशी माहिती त्यांना मिळाली. या शाळेत शिकणाऱ्या अनेक मुलांचे कुटुंब प्रमुख वेगवेगळ्या गुन्ह्याच्या कारणांमुळे कुटुंब एकट्यावर सोडून गेले आहेत. अठराविश्व दारिद्र्यामुळे मुलांची आबाळ होत आहे.
शिक्षणाचा अभाव यामुळे निर्माण होतो, ही बाब जि.प. शाळेत शिक्षक असलेले मतीन भोसले यांच्या निदर्शनास आली. त्यांनी या मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी पुढाकार घेतला. शिक्षकाची नोकरी सोडून त्यांनी याच गावात अशा विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू केली. ४९० विद्यार्थी तेथे शिकत आहेत. त्यातील १८० विद्यार्थी अनाथ आहेत. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी नुकतीच या शाळेला भेट देऊन तेथील स्थितीची पाहणी केली होती. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले होते. त्यानंतर हेल्पिंग हॅन्डस्चे सर्व साहित्य या शाळेला पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हेल्पिंग हॅन्डस्सह इतर सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मंगरूळ चवाळा गावात दाखल झाले. शाळेच्या प्रांगणातच शेकडो बालकांच्या उपस्थितीत साहित्य वितरणाचा दान महोत्सव येथे साजरा झाला. विद्यार्थ्यांना हे साहित्य मिळाल्यावर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. यावेळी हेल्पिंग हॅन्डस्चे प्रतीक मुधोळकर, पूर्वा दोंतुलवार, ममता पटवर्धन, किरण भांदककर, आधार फाऊंडेशन यवतमाळचे राजीव पडगीलवार, श्रमसाफल्य संस्थेचे अमित पडलवार, अस्तित्व फाऊंडेशनच्या मनिषा भोसले (काटे) आदी उपस्थित होते. या सर्वांचे मतीन भोसले यांनी स्वागत केले व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद उराशी घेऊन हे सारे मान्यवर तेथून परतले. (तालुका प्रतिनिधी)