हेलिकॉप्टरने मतदान प्रक्रियेला झाली मदत
By Admin | Updated: October 15, 2014 23:17 IST2014-10-15T23:17:17+5:302014-10-15T23:17:17+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदार संघात निवडणूक प्रक्रियेसाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाने दोन हेलिकॉप्टरची मदत घेतली. हेलिकॉप्टरमुळे दुर्गम भागात पोलिंग पार्ट्या पोहोचविण्याचे

हेलिकॉप्टरने मतदान प्रक्रियेला झाली मदत
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदार संघात निवडणूक प्रक्रियेसाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाने दोन हेलिकॉप्टरची मदत घेतली. हेलिकॉप्टरमुळे दुर्गम भागात पोलिंग पार्ट्या पोहोचविण्याचे काम सुलभपणे करता आले. तसेच मतदान झाल्यानंतर या पार्ट्यांना सुरक्षितपणे अहेरी मुख्यालयात आणण्याचेही काम करण्यात आले.
नक्षलग्रस्त अहेरी विधानसभा मतदार संघात २८६ मतदान केंद्रांपैकी ९७ मतदान केंद्र हे अतिसंवेदनशील, १०७ मतदान केंद्र हे संवेदनशील होते. या मतदान केंद्रावर पोलिंग पार्टी पोहोचविण्यासाठी मोठा सुरक्षा बंदोबस्त ठेवावा लागत होता. मात्र यावेळी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आल्याने पोलीस प्रशासनाला हे काम अतिशय सुलभपणे करता आले. अहेरी तालुक्यातील व्यंकटापूर, भामरागड तालुक्यातील लाहेरी यासारख्या संवेदनशील भागात पोलिंग पार्टीला पोलिसांनी हेलिकॉप्टरद्वारे पोहोचविले. नक्षलग्रस्त भागातील मतदारांनाही सुरक्षितपणे मतदान केंद्रापर्यंत आणण्याचे काम प्रशासनानेच यावेळी केले. भामरागड तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम गावातील मतदार आदल्या दिवशीपासूनच स्थानिक पोलीस ठाण्यात मुक्कामी आणण्यात आले होते, अशी प्राथमिक माहिती आहे. एटापल्ली तालुक्याच्या अनेक गावातून आज मतदान केंद्रावर नेण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. नदी व नाले ज्या ठिकाणी पार करून मतदान केंद्रावर पोहोचायचे आहे. तेथे डोंग्याचीही व्यवस्था प्रशासनाने केली होती.
मतदान प्रक्रिया पार पाडत असतांना आज घोट परिसरातील मक्केपल्ली भागात पोलीस पार्टीच्या मार्गावर नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला. या स्फोटात एक जवान जखमी झाला. त्याला तत्काळ उपचारासाठी हेलिकॉप्टरने नागपूरला हलविण्यात आले. चापलवाडा मतदान केंद्रावरून ईव्हीएम मशीन घेऊन परत येत असतांना नक्षलवाद्यांनी मक्केपल्ली जंगलात सायंकाळी ५ वाजता ही घटना केली. मात्र हेलिकॉप्टरमुळे जखमी जवानाला तत्काळ मदत मिळाली व पोलीस पार्टी सुरक्षितपणे ईव्हीएम घेऊन पोहोचली. लोकसभा निवडणुकीत हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला नव्हता.