जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 06:00 AM2019-09-05T06:00:00+5:302019-09-05T06:00:32+5:30

अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूर आला असून आलापल्ली-भामरागड, वडधा-देवापूर, आष्टी ते मुलचेरा या मार्गावरील दिना नाल्याला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद आहे. तसेच पोहार नदीची पाणीपातळी वाढल्यामुळे चामोर्शी-गडचिरोली मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. चामोर्शी मार्गावरील कुनघाडा फाटानजीकच्या नाल्यावर पाणी चढल्याने या मार्गावरील वाहतूक बंद आहे.

Heavy rains again hit the district | जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा

जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा

googlenewsNext
ठळक मुद्देजनजीवन विस्कळीत : गडचिरोली शहरातील घरांसह सरकारी कार्यालयेही जलमय

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी होऊन घरांची पडझड झाली. शिवाय अनेक मार्गही बंद झाले आहेत. बुधवारी सकाळी ९ वाजतापासून गडचिरोली शहरात चार तास मुसळधार पाऊस बरसला. या पावसामुळे शहरात हाह:कार माजविला. नागरी वस्त्या, सरकारी कार्यालयांसह रस्तेही पूर्णपणे जलमय झाले होते. मात्र दुपारनंतर पावसाने उसंत घेतल्याने शहरातील जनजीवन पूर्वपदावर आले. गडचिरोली शहरात ४ तासात १८५.२ मिमी पाऊस बरसल्याची नोंद सरकारी यंत्रणेने घेतली आहे.
अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूर आला असून आलापल्ली-भामरागड, वडधा-देवापूर, आष्टी ते मुलचेरा या मार्गावरील दिना नाल्याला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद आहे. तसेच पोहार नदीची पाणीपातळी वाढल्यामुळे चामोर्शी-गडचिरोली मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. चामोर्शी मार्गावरील कुनघाडा फाटानजीकच्या नाल्यावर पाणी चढल्याने या मार्गावरील वाहतूक बंद आहे. संततधार पावसामुळे रेगडी येथील कन्नमवार जलाशय १०० टक्के भरला असून वेस्टवेअरमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान रेगडी जलाशयाला आता पर्यटनाचे रूप आले असून दररोज शेकडो पर्यटक येथे भेट देत आहेत. चामोर्शी-मार्र्कंडादेव मार्गावरील नाल्यावर पाणी चढल्याने हा मार्ग सकाळपासूनच बंद होता.
चामोर्शी शहरासह तालुक्यात पावसाने कहर केला. चामोर्शी शहराच्या मुख्य बाजारपेठेतील मार्गावर सकाळच्या सुमारास दोन फूट पाणी होते. काही घरांमध्ये पाणी शिरल्याने किरकोळ स्वरूपाचे नुकसान झाल्याची माहिती आहे. वैनगंगा नदी दुथळी भरून वाहत आहे. गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले असून येथून ३६८२ क्यूमेक्स इतका पाण्याचा विसर्ग होत आहे. चिचडोह बॅरेजचेही ३८ गेट उघडण्यात आले असून येथून ८३०२.२४ क्यूमेक्स इतका पाण्याचा विसर्ग होत आहे.
तळोधी (मो.) परिसरातही पावसाने कहर केला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने येथील मुख्य रस्त्यालगत मोरेश्वर भोयर व प्रकाश भोयर यांचे घर कोसळले. यावेळी कुटुंबीय घरातील साहित्य बाहेर काढत होते. हातातील सामान फेकून देऊन मागे सरकल्याने ते बचावले. तसेच रस्त्यावर कुणी नसल्याने जीवितहानी झाली नाही. शेजारच्या रमेश भोयर यांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. रामपुरी टोली येथील पोयाम बाबुराव ठाकूर यांचे घर कोसळले. केशव भोयर, नक्टू शेरकी, प्रभाकर लिंगोजवार, रमेश चाटारे, लक्ष्मण आदे, भाऊजी भोयर यांच्या घरांची पडझड झाली आहे. मुरमुरी नदीच्या पुलावर पाणी वाढले असल्याने येडानूर, कुथेगाव, जोगना, लसनपेठ, ढेकणी, मुतनूर आदी मार्ग बंद झाले आहेत.

गडचिरोली शहरातील रस्ते आणि वस्त्याही पाण्याखाली
गडचिरोली शहरात रोजच पावसाची हजेरी सुरू आहे. मात्र बुधवारी सकाळी मुसळधार पावसाला सुरूवात झाली. तब्बल चार तास पावसाने गडचिरोली शहराला झोडपून काढले. या पावसामुळे चामोर्शी, आरमोरी, चामोर्शी व मूल या चारही मार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचले होते. परिणामी वाहतूक काही वेळासाठी प्रभावित झाली. चामोर्शी मार्गापासून रेड्डी गोडाऊन ते पोटेगावकडे जाणाऱ्या मार्गावर दोन फूट पाणी वाहत होते. चामोर्शी मार्गावर राधे बिल्डींगच्या परिसरात सर्वत्र पाणी साचले होते. त्यामुळे याही मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती. आरमोरी मार्गावरील खरपुंडी नाक्याच्या परिसरात रस्त्यावर प्रचंड पाणी होते. तसेच खड्डेही असल्यामुळे त्यातून वाहन काढताना मोठी कसरत होत होती. त्यामुळे ट्राफिक जाम झाले होते. पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. गडचिरोलीचे ठाणेदार प्रदीप चौगावकर यांनी स्वत: फिरून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
धानोरा मार्गावर बसस्थानक आणि गडचिरोली नगर परिषदेच्या परिसरात गुडघ्याच्या वर पाणी साचल्याने चांगलीच तारांबळ उडाली. पंचायत समितीचा आवारही पूर्णपणे जलमय झाला होता. युनियन बँक परिसर व त्यालगतच्या दुकानाच्या चाळीमध्येहीे पावसाचे पाणी शिरले होते. विवेकानंदनगर, कन्नमवारनगर, अयोध्या नगरातील रस्ते पूर्णत: पाण्याखाली होते. मोकळ्या भूखंडांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. या भागातील ५० वर घरांमध्ये पाणी शिरले. गोकुलनगर तलावालगतच्या बºयाच घरांमध्ये पाणी शिरले. विसापूर व कॉम्प्लेक्स भागातही पावसाने कहर केला. विसापूर मार्गावरील नाल्यावर अडीच फुट पाणी होते. त्यामुळे या मार्गावरील बंद होती.

पुरात अडकलेल्यांना पोलिसांची मदत
मंगळवारी झालेल्या जोरदार पावसामुळे भामरागड तालुक्याच्या ताडगावजवळील कुडूम नाला व कुमारगुड्डा नाला दुथळी भरून वाहत असल्याने काही लोक दोन्ही नाल्यामध्ये अडकले होते. नाल्याच्या पुरात अडकून पडलेल्या नागरिकांना ताडगाव पोलीस मदत केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांचे सहकार्य घेऊन दोरीच्या सहाय्याने सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. सर्व नागरिकांना ताडगाव पोलीस मदत केंद्रात आणून या ठिकाणी त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारला कुडूम नाल्याचा काही भाग वाहून गेल्यामुळे या ठिकाणी मोठा खड्डा निर्माण झाला. जेसीबीद्वारे हा खड्डा बुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पाऊस आणखीच वाढत असल्याने नाल्यावर पाणी चढले. परिणामी नाला दुरूस्तीच्या कामात अडथळा निर्माण झाला. नाल्याच्या पलिकडे अडकलेल्या लोकांना ताडगाव पोलीस व सीआरपीएफच्या जवानांनी सुरक्षितरित्या ताडगावकडे बाहेर काढण्यात यश मिळविले.

अनेक ठिकाणी घरांची पडझड
चामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा येथे संततधार पावसामुळे दोन घरांची अंशत: पडझड झाली आहे. विजय नामदेव डांगे व सिंधूबाई मारोती दहिकर यांच्या घराची पडझड झाल्याने त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. तलाठी धनराज शेडमाके, सरपंच वनीता पोरेड्डीवार, पोलीस पाटील श्रीरंग म्हशाखेत्री, कोतवाल, मोरेश्वर साखरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचानामा केला. नुकसानभरपाई मिळण्याची मागणी त्यांनी केली आहे. गडचिरोली शहराच्या इंदिरानगर वॉर्ड क्र.५ मधील माता मंदिराजवळील कांताबाई एकनाथ वासेकर यांचे घर पावसाने कोसळले. मदतीची मागणी वासेकर यांनी केली आहे.

Web Title: Heavy rains again hit the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस