गॅस तुटवड्याने जिल्हाभरातील ग्राहक हैराण

By Admin | Updated: February 21, 2017 00:44 IST2017-02-21T00:44:11+5:302017-02-21T00:44:11+5:30

जिल्हाभरातील भारत गॅस एजन्सीमध्ये सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला असल्याने या एजन्सीचे ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहे.

Heavy to customer in the city, due to gas exhaustion | गॅस तुटवड्याने जिल्हाभरातील ग्राहक हैराण

गॅस तुटवड्याने जिल्हाभरातील ग्राहक हैराण

भारत गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा : नागपूर येथील प्लान्टमध्ये लिक्विडचा तुटवडा
गडचिरोली : जिल्हाभरातील भारत गॅस एजन्सीमध्ये सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला असल्याने या एजन्सीचे ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहे. मागील आठ दिवसांपासून गॅसचे वाटप ठप्प पडल्याने सोमवारी सकाळपासून गडचिरोली येथील भारत गॅस एजन्सीसमोर ग्राहकांची फार मोठी रांग लागली होती. सकाळपासून रांगेमध्ये लागलेल्या ग्राहकांना दुपारी १२ वाजता संपूर्ण सिलिंडर संपल्याने खाली हातानेच परतावे लागले.
गॅस सिलिंडरमध्ये लिक्वीड भरण्याचा प्लॅन्ट नागपूर येथे आहे. येथूनच संपूर्ण विदर्भात सिलिंडर भरून पाठविले जातात. मात्र मागील काही दिवसांपासून नागपूर येथील प्लॅन्टमध्ये गॅस लिक्वीडचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे एजन्सीधारकांना मागील तीन महिन्यांपासून पुरेसे सिलिंडर मिळण्यास अडचण जात आहे. गडचिरोली शहरात भारत गॅस एजन्सीचे जवळपास पाच हजार ग्राहक आहेत. दरदिवशी ७० ते ८० सिलिंडरची विक्री होते. मात्र मागील दोन महिन्यांपासून सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने सिलिंडर विक्री थांबविण्यात आली होती. सोमवारी सकाळीच सिलिंडर भरलेले वाहन गडचिरोलीत दाखल झाले. त्यामुळे सिलिंडर खरेदी करण्यासाठी भारत गॅस एजन्सीसमोर ग्राहकांची फार मोठी रांग लागली होती. काही ग्राहकांना तर १५ दिवसांपूर्वीच गॅस बुकींग करूनही गॅस मिळाली नव्हती. सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंत ग्राहक जुना सिलिंडर धरून रांगेमध्ये लागले होते. मात्र १२ वाजताच्या सुमारास संपूर्ण सिलिंडर संपले. त्यानंतर गोदामामध्ये २० सिलिंडर होते. मात्र तेही सिलिंडर काही वेळताच संपले. त्यामुळे ७० पेक्षा अधिक ग्राहकांना परत जावे लागले.
हीच परिस्थिती जिल्हाभरातील इतरही भारत गॅस एजन्सीमध्ये आहे. त्यामुळे भारत गॅस एजन्सीचे ग्राहक कमालीचे त्रस्त आहेत. ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांकडे एकच सिलिंडर उपलब्ध आहे. त्यामुळे या ग्राहकांना दुसरे सिलिंडर उपलब्ध न झाल्यास त्यांना चुलीवर स्वंयपाक केल्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. गॅस सिलिंडरच्या तुटवड्याचा प्रश्न तत्काळ निकाली काढावा, अशी मागणी होत आहे.
बीपीएलधारक नागरिकांना शासनाच्या वतीने तसेच वन विभागाच्या मार्फतीनेही ग्रामीण भागातील नागरिकांना गॅसचे वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास सर्वच नागरिकांच्या घरी गॅस आहे. त्यामुळे गॅस तुटवड्याचा फटका शहरी भागातील महिलांसह ग्रामीण भागातील महिलांनाही बसला असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)

आणखी महिनाभर कायम राहणार परिस्थिती
नागपूर येथील गॅस रिफिल करण्याच्या प्लान्टमध्ये लिक्विडचा तुटवडा निर्माण झाला आहे. सदर तुटवडा मागील दोन ते तीन महिन्यांपासून निर्माण झाला आहे. मात्र लिक्विडचा तुटवडा इतर गॅस एजन्सीला न निर्माण होता, भारत गॅस एजन्सीलाच का निर्माण झाला, याचे तांत्रिक कारण गडचिरोली जिल्ह्यातील गॅस एजन्सीधारकांना माहित नाही. मात्र आणखी १५ दिवस ते एक महिना गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गडचिरोलीसह नागपूर, चंद्रपूर व विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याही जिल्ह्यामध्ये गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांच्या मोठमोठ्या रांगा लागत असल्याचे दिसून येत आहे.
सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने मागील १५ दिवसांपासून शहरात घरपोच सिलिंडर सुविधा बंद करण्यात आली आहे.

Web Title: Heavy to customer in the city, due to gas exhaustion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.