फरार आरोपींबाबत शुक्रवारी होणार सुनावणी
By Admin | Updated: April 9, 2015 01:29 IST2015-04-09T01:29:55+5:302015-04-09T01:29:55+5:30
जिल्ह्यात उघडकीस आलेल्या शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणातील सात फरार आरोपींबाबत सोमवारपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी सुरू आहे.

फरार आरोपींबाबत शुक्रवारी होणार सुनावणी
गडचिरोली : जिल्ह्यात उघडकीस आलेल्या शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणातील सात फरार आरोपींबाबत सोमवारपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी सुरू आहे. फरार आरोपींबाबत आता शुक्रवारी अंतिम सुनावणी होणार असून न्यायालय निर्णय देणार आहे, अशी माहिती विशेष तपास अधिकारी पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.
शिष्यवृत्ती घोटाळ्यातील आरोपी लेखाधिकारी मनोजकुमार मून, सहाय्यक लेखाधिकारी प्रितमसिंग बघेले, दत्तात्रय राठोड, शिवनेरी कॉलेज आॅफ टेक्नॉलॉजी अॅन्ड मॅनेजमेंटचा संस्थाचालक विघ्नोज राजुरकर, अॅस्पायर कॉलेजचा संस्थाचालक शहाबाज हैदर, शहनवाज खान व चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथील संस्थाचालक रोहीत बोम्मावार यांच्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सोमवारपासून सुनावणी सुरू आहे. सदर आरोपींबाबत अंतिम सुनावणी आता बुधवारी होणार असून निर्णय दिला जाणार आहे. शिष्यवृत्ती घोटाळ्यातील आरोपी सुरज बोम्मावार, रोहीत बोम्मावार यांचा जामीन अर्ज उच्च व सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. जामीन फेटाळलेले हे आरोपी पोलिसांपुढे शरण न आल्यास त्यांना शोधून अटक करणार, अशी माहिती रवींद्र पाटील यांनी दिली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)