आरोग्य कर्मचारी आंदोलनावर

By Admin | Updated: June 25, 2015 01:53 IST2015-06-25T01:53:34+5:302015-06-25T01:53:34+5:30

आरोग्य कर्मचाऱ्यांना चार महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांसमोर अनेक अडचणी येत आहेत.

Health workers protest | आरोग्य कर्मचारी आंदोलनावर

आरोग्य कर्मचारी आंदोलनावर

चार महिन्यांपासून पगार नाही : सीईओंनी आश्वासन पाळले नसल्याचा आरोप
गडचिरोली : आरोग्य कर्मचाऱ्यांना चार महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांसमोर अनेक अडचणी येत आहेत. वेतन मिळावे, या मागणीसाठी बुधवारपासून गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेसमोर तसेच प्रत्येक तालुकास्थळावर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर आरोग्य कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा प्रभावीत होणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी जिल्हा मुख्यालयात तीव्र निदर्शने केली.
सदर आंदोलन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीच्या नेतृत्त्वात करण्यात येत आहे. यात प्रयोगशाळा तंत्रज्ञ संघटना, औषध निर्माण अधिकारी संघटना आदींचे पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहे. मागील चार महिन्यांपासून वेतन न झाल्याने १० दिवसांत वेतन करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. आश्वासन देऊनही वेतन झालेले नाही. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना कुटुंबाचा गाडा ओढणे कठीण झाले आहे. बँकेचे कर्ज, मुलांचा शैक्षणिक खर्च आदी भागविण्यासह अडचण निर्माण झाली आहे. याबाबीच्या निषेधार्थ प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आरोग्य कर्मचारी संघटनेने तीव्र आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत वेतन मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
जिल्हास्तरावरील आंदोलनाचे नेतृत्त्व जि. प. आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र खरवळे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ संघटनेचे अध्यक्ष शैलेश जांभुळे, औषधी निर्माण अधिकारी संघटनेचे अध्यक्ष अतुल अलमपटलार, विनोद सोनकुसरे, जे. यू. टिंगणे, हेमंत पेशट्टीवार, एच. एम. कोटरंगे, एस. आर. धाबाडे, विवेक मून, अनिल मंगर, निलू वानखेडे, भुरसे, आनंद मोडक आदींनी केले. आंदोलनात दाभाडे, चल्लारवार, फुलझेले, कुथे, राऊत, एम. व्ही. बानबले, आर. यू. भटारकर, व्ही. एल. बोरकर, पी. बी. म्हशाखेत्री, कुळमेथे, पी. डब्ल्यू. गेडाम, सोनुले, कावळे, बारसागडे, कुरेशी, जांभुळे, जाधव, कडू, शेंडे, कोडापे, अल्लीवार, नैताम आदींसह बहुसंख्य आरोग्य कर्मचारी सहभागी झाले आहेत.
जि. प. प्रशासनाने तत्काळ वेतन न काढल्यास आंदोलन पुन्हा तीव्र करू, असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. बुधवारपासून आरोग्य कर्मचाऱ्यांनी मासिक बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Health workers protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.