आरोग्य सेवा आॅक्सिजनवर
By Admin | Updated: August 31, 2015 01:15 IST2015-08-31T01:15:38+5:302015-08-31T01:15:38+5:30
नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य विभागात रिक्तपदांचे ग्रहण कायम आहे.

आरोग्य सेवा आॅक्सिजनवर
रुग्णांची हेळसांड : वर्ग ३ व ४ ची २२६ पदे रिक्त
गडचिरोली : नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य विभागात रिक्तपदांचे ग्रहण कायम आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय मिळून वर्ग ३ व ४ ची एकूण तब्बल २२६ पदे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. त्यामुळे शहरी भागातील आरोग्य सेवा आॅक्सिजनवर असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात वर्ग ३ व ४ ची मिळून एकूण ६९२ पदे मंजूर आहेत. यापैकी ४६६ पदे भरण्यात आली आहे. तर तब्बल २२६ पदे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. रिक्त असलेल्या वर्ग ३ मध्ये परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांची मिळून एकूण १४४ पदे रिक्त आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्ग ३ ची २०० पदे मंजूर आहेत. यापैकी १२२ पदे भरण्यात आली असून तब्बल ७८ पदे रिक्त आहेत. अशाच प्रकारे अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात आठ, आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात चार, कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात १० व भामरागड उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांची तब्बल १२ पदे रिक्त आहेत. सिरोंचाच्या ग्रामीण रुग्णालयात वर्ग ३ ची दोन, धानोराच्या ग्रामीण रुग्णालयात पाच, एटापल्ली तीन, चामोर्शी दोन, कोरची सहा, मुलचेरा सहा, देसाईगंज दोन व आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात सहा पदे रिक्त आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्ग ४ ची एकूण २५८ पदे मंजूर आहेत. यापैकी १७६ पदे भरण्यात आली असून ८२ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे जिल्हा क्षयरोग केंद्रातही पदे रिक्त आहेत. वर्ग ३ व ४ ची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना वेळेवर औषधोपचार मिळण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. रिक्तपदांमुळे कार्यरत वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा भार सोसावा लागत आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी वर्ग ३ व ४ ची पदभरती करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने नियोजन व तयारी सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.