आरोग्य सेवा अस्थिपंजर
By Admin | Updated: January 31, 2015 23:18 IST2015-01-31T23:18:39+5:302015-01-31T23:18:39+5:30
जिल्हा व तालुकास्तरावरील जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून वर्ग एकच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची १८ व वर्ग दोनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची १५ अशी

आरोग्य सेवा अस्थिपंजर
डॉक्टरांची कमतरता : वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३३ पदे रिक्त
गडचिरोली : जिल्हा व तालुकास्तरावरील जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून वर्ग एकच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची १८ व वर्ग दोनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची १५ अशी एकूण ३३ पदे डॉक्टरांची रिक्त आहेत. त्यामुळे जिल्हा व तालुकास्तरावरील शहरी भागातील आरोग्य सेवा अस्थिपंजर झाली असल्याची दिसून येते.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्र व फिरते पथक आहेत. या सर्वच रूग्णालयामध्ये डॉक्टरांची पदे रिक्त आहे. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे दुर्गम, अतिदुर्गम व ग्रामीण भागातील अनेक रूग्ण उपचारासाठी ग्रामीण, उपजिल्हा व जिल्हा रूग्णालयाकडे वळत असतात. मात्र या ही रूग्णालयात अनेक तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे मागास गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य रूग्णांना खासगी रूग्णालयात जाऊन महागळा औषधोपचार घ्यावा लागत आहे.
जिल्ह्यात वर्ग एकच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची एकूण ३१ पदे मंजूर आहेत. यापैकी १३ कार्यरत असून १८ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये सर्वाधिक अधिक जिल्हा सामान्य रूग्णालयातील ११ पदांचा समावेश आहे. चामोर्शी, धानोरा, आष्टी, मुलचेरा, सिरोंचा, कोरची व भामरागड आदी ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांचे पद रिक्त आहे.
जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयाचे मिळून वर्ग दोनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एकूण ८० पदे मंजूर आहेत. यापैकी ६५ पदे भरण्यात आले असून गेल्या अनेक वर्षांपासून १५ पदे रिक्त आहे. रिक्त पदांमध्ये अहेरी उपजिल्हा रूग्णालय तीन, आरमोरी उपजिल्हा रूग्णालय एक, कुरखेडा उपजिल्हा रूग्णालय एक, ग्रामीण रूग्णालय सिरोंचा येथील दोन, चामोर्शी ग्रामीण रूग्णालयातील एक, एटापल्ली ग्रामीण रूग्णालय दोन, तसेच आष्टी व कोरची ग्रामीण रूग्णालयात डॉक्टरांचे प्रत्येकी एक पद रिक्त आहे. मुलचेरा, देसाईगंज व भामरागड या तीन ग्रामीण रूग्णालयात वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांचे प्रत्येकी एक पद रिक्त आहे. जिल्ह्यात खासगी औषध उपचारांच्या सोयीसुविधा कमी आहे. मोठ्या शहरातील तज्ज्ञ डॉक्टर गडचिरोली जिल्ह्यात बदलीवर शासकीय रूग्णालयांमध्ये येऊन सेवा देण्यास तयार होत नाही. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य सेवेतील डॉक्टरांच्या पदाचा अनुशेष शिल्लक राहतो व वारंवार रिक्त पदाचा प्रश्नही कायमच राहत आहे. राज्य शासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांना ग्रामीण भागात सेवा देणे सक्तीचे केले असतानाही बंधपत्रित वैद्यकीय अधिकारीही येथे येत नाही. राज्य शासनाने त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची गरज आहे. (स्थानिक प्रतिनिधी)