पूर ओसरल्यावर आरोग्य विभागाचे ‘मिशन भामरागड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 06:00 IST2019-09-12T06:00:00+5:302019-09-12T06:00:37+5:30
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ग्रामीण भागातील दुर्गम गावांमध्ये पूरपरिस्थितीनंतर उपाययोजना करण्याच्या सूचना दोन दिवसांपुर्वीच सर्व प्रशासनाला दिल्या होत्या. त्यातूनच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर यांच्या संकल्पनेतून आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची यादी अंतिम करण्यात आली.

पूर ओसरल्यावर आरोग्य विभागाचे ‘मिशन भामरागड’
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सलग सहा ते सात दिवस पूरपरिस्थितीला तोंड दिलेल्या भामरागड तालुक्यातील नागरिकांना आरोग्याबाबत मदतीसाठी ‘मिशन भामरागड’ अभियान आरोग्य विभागाकडून सुरु करण्यात आले आहे. स्वेच्छेने आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची ४७ जणांची टीम भामरागड येथे बुधवारी रोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी रवाना झाली. १३ सप्टेंबरपर्यंत भामरागड तालुक्यातील ग्रामीण भागात ही चमू आरोग्य सेवा देणार आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ग्रामीण भागातील दुर्गम गावांमध्ये पूरपरिस्थितीनंतर उपाययोजना करण्याच्या सूचना दोन दिवसांपुर्वीच सर्व प्रशासनाला दिल्या होत्या. त्यातूनच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर यांच्या संकल्पनेतून आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची यादी अंतिम करण्यात आली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांनी याबाबत आरोग्य विभागाच्या नाविण्यपुर्ण उपक्र माला पाठबळ दिले. यातून ४७ लोकांची चमू भामरागडसाठी रवाना झाली.
गेल्यागेल्या अधिकाऱ्यांनी तिथे बैठक घेऊन योग्य त्या सूचना दिल्या. भामरागड तालुक्यातील १२८ गावांमध्ये प्राथमिक औषधोपचार, रोगप्रतिबंधात्क उपाययोजना, जनजागृतीपर कार्यक्र म घेतले जाणार आहेत. तसेच आवश्यक तातडीची मदत लागेल त्या ठिकाणी जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका रुग्णालय यांची मदत घेतली जाणार आहे. प्रशासनाकडून देण्यात येणारे पुरग्रस्तांचे साहित्य वाटप यासाठीही ही टीम काम करणार आहे.
जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.सुनील मडावी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विनोद म्हशाखेत्री, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुणाल मोडक, जिल्हा कार्यक्र म व्यवस्थापक डॉ.अनुपम महेशगौरी यांचा या चमूत समावेश आहे. तसेच ४ तालुका आरोग्य अधिकारी, ८ वैद्यकीय अधिकारी, २८ आरोग्य सहाय्यक (पुरूष) व आरोग्य सेवक यांचा समावेश या टीममध्ये करण्यात आला आहे.