Health centers reached a distance of 5 km for delivery | प्रसुतीसाठी ३५ किमी अंतर चालत गाठले आरोग्य केंद्र
प्रसुतीसाठी ३५ किमी अंतर चालत गाठले आरोग्य केंद्र

ठळक मुद्देबाळ व माता सुखरूप : छत्तीसगड राज्यातील महिलेची थरारक कहाणी, कच्चा रस्ता अन् नालेही केले पार

श्यामराव येरकलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाहेरी : आरोग्य केंद्रात प्रसुती होण्यासाठी छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्यातल्या उसेवाडा येथील मासे कादू दुर्वा या २८ वर्षीय गरोदर मातेने सुमारे ३५ किमी अंतर पायदळ चालून लाहेरी आरोग्य केंद्र गाठले. आरोग्य केंद्रात तिची सुरळीत प्रसुती करण्यात आली असून बाळ व माता दोघेही सुखरूप आहेत. या घटनेवरून भामरागड तालुका व छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या गावांमधील विदारक परिस्थितीची पुन्हा एकदा दिसून आली.
भामरागड तालुक्याला छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे. या परिसरात घनदाट जंगल आहे. जंगलाच्या वाटेने पक्क्या रस्त्यांचा अभाव आहे. त्यामुळे वाहतुकीची साधने नाहीच्या बरोबर आहेत. एखाद्या व्यक्तीकडे दुचाकी आहे, मात्र रस्ते व पूल नसल्याने पावसाळ्यात दुचाकीचा वापर करणे अशक्य होते. मासे दुर्वा ही गरोदर माता व तिचे कुटुंब पूर्णपणे निरक्षरआहे. गरोदरपणात जे आरोग्य कार्ड काढायला पाहिजे ते सुध्दा तिने काढले नव्हते. यावरून तिने यापूर्वी कोणतीही वैद्यकीय तपासणी केली नसावी हे स्पष्ट आहे.
माडिया भाषेशिवाय तिला व तिच्या नातेवाईकांना दुसरी कोणतीही भाषा येत नव्हती. प्रसुतीचा कालावधी जवळ आला होता. त्यामुळे एखाद्या आरोग्य केंद्रात भरती होण्याचा सल्ला तिच्या नातेवाईकांनी दिला. छत्तीसगडमधील रहिवासी असली असली तरी तिकडे जवळपास आरोग्य केंद्र नसल्याने तिच्यासाठी ३५ किलोमीटरवर असलेले भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील आरोग्य केंद्रच जवळचे होते. त्यामुळे येथे भरती होण्यास तिच्या कुटुंबियांनी प्राधान्य दिले. घनदाट जंगल, रस्त्यांचा अभाव, पावसाळ्यात वाहणारे नदी, नाले ओलांडून पायदळ प्रवास करणे तेवढे सोपे नव्हते. तरीही पायदळ आरोग्य केंद्र गाठण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
गरोदर माता व तिचा पती, आई, सासू व गावातील दोघांनी मिळून पायदळच ३५ किमी अंतर गाठले. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.संभाजी भोकरे, डॉ.संतोष नैताम यांनी तपासणी केली. १६ सप्टेंबरच्या मध्यरात्री ती प्रसूत झाली. बाळ व मातेची प्रकृती आता ठिक आहे.

Web Title: Health centers reached a distance of 5 km for delivery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.