मुख्याध्यापकांनी नवोदयच्या चाचणी परीक्षेत बोगस विद्यार्थी बसविले
By Admin | Updated: March 12, 2015 02:03 IST2015-03-12T02:03:07+5:302015-03-12T02:03:07+5:30
सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील श्रीनिवास हायस्कूलचे मुख्याध्यापकांनी नवोदय निवड चाचणी परीक्षेत बोगस विद्यार्थ्यांना बसविल्याची तक्रार...

मुख्याध्यापकांनी नवोदयच्या चाचणी परीक्षेत बोगस विद्यार्थी बसविले
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील श्रीनिवास हायस्कूलचे मुख्याध्यापकांनी नवोदय निवड चाचणी परीक्षेत बोगस विद्यार्थ्यांना बसविल्याची तक्रार वेंकटेश्वर शिक्षण संस्था अंकिसाचे सदस्य श्रीनिवास लक्ष्मीकांतय्या वनमामुला यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.
श्रीनिवास हायस्कूल अंकिसाचे मुख्याध्यापक एस. बी. खोब्रागडे हे मागील वर्षीपासून जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी प्रवेश परीक्षेत बोगस विद्यार्थी बसवित असल्याची माहिती माहिती अधिकारातून वनमामुला यांनी मिळविली. श्रीनिवास हायस्कूल अंकिसाच्या दाखल खारीज रजिस्टरमध्ये किंवा हजेरीवर ज्या विद्यार्थ्यांची नाव नाहीत त्यांना श्रीनिवास हायस्कूलमध्ये वर्ग ५ वीत शिकत असल्याचे दाखवून नवोदय निवड चाचणी प्रवेश परीक्षेसाठी त्यांचे अर्ज भरले. व त्यांना परीक्षेला बसविले. २०१५ च्याही परीक्षेत दोन बोगस विद्यार्थ्यांना त्यांनी बसविले. तर २०१४ मध्ये सहा विद्यार्थ्यांना बसविण्यात आले.
या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, व मुख्याध्यापकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वनमामुला यांनी केली आहे.
याबाबत संबंधित शाळेचे मुख्याध्यापक एस. बी. खोब्रागडे यांना विचारणा केली असता, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीच आपल्याला गावातील कॉन्व्हेंट शाळेचे मुलं आपल्या शाळेत दाखवून त्यांना परीक्षेला बसविण्यास सांगितले होते. त्यांच्या सूचनेनुसार आपण या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसविले. आपण मागासवर्गीय समाजाचे असल्यामुळे आपल्याला त्रास देण्याच्या उद्देशाने सदर तक्रार संस्था सदस्यांनी केलेली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)