राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास झाला डोकेदुखी
By Admin | Updated: October 14, 2016 01:47 IST2016-10-14T01:47:33+5:302016-10-14T01:47:33+5:30
गडचिरोली जिल्हा मुख्यालयाला जोडणारे बहुतांशी महामार्ग हे राष्ट्रीय महामार्गात मोडणारे आहे.

राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास झाला डोकेदुखी
डागडुजीचे काम शहरात सुरू : नागरिकांकडून मात्र सार्वजनिक बांधकाम विभागावरच टीकेची झोड
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा मुख्यालयाला जोडणारे बहुतांशी महामार्ग हे राष्ट्रीय महामार्गात मोडणारे आहे. अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना या मार्गावरून प्रवास करताना प्रचंड मन:स्ताप खड्ड्यांमुळे सहन करावा लागत आहे.
सर्वसामान्य नागरिक राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने ओरड करीत असले तरी या रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे असल्याने त्यांचीच जबाबदारी ठरते, अशी माहिती पुढे आली आहे. गडचिरोली शहरातून चंद्रपूर-गडचिरोली-धानोरा-राजनांदगाव हा राष्ट्रीय महामार्ग जातो. याशिवाय गडचिरोली-चामोर्शी-आष्टी-आलापल्ली-सिरोंचा, गडचिरोली-आरमोरी-देसाईगंज-गोंदिया हाही राष्ट्रीय महामार्ग जातो. यंदा प्रचंड अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्गांना जागोजागी खड्डे पडले आहेत. चंद्रपूर-गडचिरोली मार्गाची तर अतिशय दुरवस्था झाली आहे. या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला करावे लागणार आहे. यात राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोणताही संबंध येत नाही. मात्र या रस्त्यावरून प्रवास करणारे अनेक प्रवासी सार्वजनिक बांधकाम विभागाच्याच नावाने बोटे मोडण्याचे काम करीत आहे. अनेक नागरिकही गडचिरोलीस्थित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना गावागावातून दूरध्वनी व भ्रमध्वनीवर या रस्त्याच्या तक्रारी करीत आहेत. त्यामुळे त्यांनाही तेवढाच मन:स्ताप आपली जबाबदारी नसतानाही सहन करावा लागत आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या प्रश्नावरून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे रस्ते दुरूस्तीचे काम आहे. पावसाळा आता संपला. त्यामुळे आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्ता दुरूस्तीच्या कामाला सुरुवात करेल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रदीप खवले यांनी अनौपचारिक चर्चेदरम्यान दिली. (जिल्हा प्रतिनिधी)
गोदावरीच्या पुलाचे काम पूर्ण
सिरोंचा तालुक्यात तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या गोदावरी नदीच्या पुलाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. या पुलावरून वाहतूक सुरू झाली. काही किरकोळ काम अपूर्ण आहे, ते पूर्ण केले जातील, अशी माहितीही अधीक्षक अभियंता प्रदीप खवले यांनी दिली. गडचिरोलीलगतच्या कठाणी नदीच्या पुलाचेही काम लवकरच सुरू केले जाईल. सध्या नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. त्यामुळे साहित्य ठेवण्यासही अडचण आहे. पाणी कमी होताच या पुलाच्या कामाला गती दिल्या जाईल, असे त्यांनी सांगितले.