वन विभागातर्फे कोसरी, उराडी येथे जलपूजन
By Admin | Updated: August 17, 2016 01:46 IST2016-08-17T01:46:04+5:302016-08-17T01:46:04+5:30
तालुक्यातील देलनवाडी वन परिक्षेत्राच्या वतीने १५ आॅगस्ट रोजी सोमवारला महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत

वन विभागातर्फे कोसरी, उराडी येथे जलपूजन
मार्गदर्शन : पाणी संवर्धन, पातळी वाढवा
आरमोरी : तालुक्यातील देलनवाडी वन परिक्षेत्राच्या वतीने १५ आॅगस्ट रोजी सोमवारला महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०१५- १६ मध्ये देलनवाडी उपक्षेत्राच्या कोसरी बिटात कक्ष क्रमांक ३१७ व उराडी बिटातील कक्ष क्रमांक ३११ मध्ये बांधण्यात आलेल्या खोदतळ्याच्या पाण्याची पूजा करून जल पूजनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देलनवाडीचे सरपंच माणिक पेंदाम होते. प्रमुख अतिथी म्हणून देलनवाडीचे वन परिक्षेत्राधिकारी अनिल साळवे, ग्रा. पं. सदस्य दिवाकर हर्षे, कोसरी वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश मडावी, देलनवाडीचे तंमुस अध्यक्ष उमाजी निकुरे, ग्रा. पं. सदस्य सविता श्रीरामे, वैशाली भैसारे, किरण म्हस्के, देलनवाडीचे क्षेत्रसहायक बी. ए. मसराम, कोसरीचे वनरक्षक के. बी. गुरनुले, उराडीचे वनरक्षक एन. डी. सावसाकडे आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी कोसरी व उराडी येथे खोदतळ्याच्या ठिकाणी जलपूजन केले. मार्गदर्शन करताना सरपंच माणिक पेंदाम म्हणाले, खोदतळ्याच्या बांधकामामुळे वन्य प्राणी व पशुपक्ष्यांना तसेच पाळीव जणावरांना पाण्याचा उपयोग होईल, सोबतच शेती सिंचन सुविधा होईल. वन परिक्षेत्राधिकारी अनिल साळवे यांनी खोदतळ्याच्या कामातून पाणीसाठा वाढेल, पाण्याचे संवर्धन होईल, तलाव, बोड्या निर्मितीतून गावकऱ्यांनी पाणी अडविले पाहिजे, असे सांगितले. (शहर प्रतिनिधी)