दीडशे वर्षांपासून हरीनामाचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 23:43 IST2017-09-24T23:41:52+5:302017-09-24T23:43:05+5:30
स्त्री म्हणजे शक्ती. अलौकिक, अद्भुत, अनाकलनीय अशा स्त्रीशक्तीच्या विविधांगी नऊ रुपांसमोर नतमस्तक होण्याचाच नव्हे तर पूजनाचा नऊ रात्रींचा उत्सव म्हणजे नवरात्री उत्सव.

दीडशे वर्षांपासून हरीनामाचा गजर
विष्णू दुनेदार/अतुल बुराडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुळशी/विसोरा : स्त्री म्हणजे शक्ती. अलौकिक, अद्भुत, अनाकलनीय अशा स्त्रीशक्तीच्या विविधांगी नऊ रुपांसमोर नतमस्तक होण्याचाच नव्हे तर पूजनाचा नऊ रात्रींचा उत्सव म्हणजे नवरात्री उत्सव. मानव जातीवर तथा सृष्टीवर आरुढ होऊ पाहणाºया वाईट प्रवृत्तींच्या नायनाटासाठी, त्यातून मुक्त होण्यासाठी आदीशक्तीची आराधना नवरात्रोत्सवात केली जाते. हीच परंपरा सामाजिक, मानवसेवा व आदरभावाने देसाईगंज तालुक्यातील कोकडी येथे मागील १५० वर्षांच्या कालावधीपासून नवरात्रीत हरीनाम सप्ताहाच्या रुपात आजही जोपासली जात आहे.
कोकडी येथे नवरात्री उत्सवानिमित्त मोठा देऊळ हनुमान मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताह व घटस्थापना करण्याची परंपरा सुरू आहे. याबाबत कोकडीचे वयोवृध्द नागरिक गोपाळा मंगरु बन्सोड सांगतात की, त्यांची आई सीताबाई बन्सोड यांचे ३० वर्षांपूर्वी वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. तेव्हा गोपाळा बन्सोड हे लहान होते. त्यांच्या आईने लहानपणीच्या नवरात्र उत्सवाच्या प्रारंभाबद्दल सांगितले. गावात सुखसमृध्दी नांदावी, कल्याण व्हावे, लोकांमध्ये आपुलकी, प्रेम, आदर, समर्पण तथा समजूतदारीची भावना वाढीस लागून गावात निरंतर एकोपा टिकून राहावा यासाठीच आमच्या पूर्वजांनी ही भक्ती, प्रार्थना सुरु केली असल्याच्या प्रतिक्रिया ज्येष्ठ मंडळींनी दिल्या. गावातील मंडळींनी ३८ वर्षांपूर्वी लहान हनुमान मंदिर नावाचे देऊळ बांधले. या मंदिरात सुध्दा ३८ वर्षांपासून अखंडपणे हरिनाम सप्ताह व घटस्थापना ही परंपरा सुरू आहे.
सात दिवस अनोखा उत्सव
नवरात्रीच्या सात दिवसांत सतत कसलाही खंड पडू न देता भजन गायन म्हणजे अखंड टाळी आणि अखंड तेवत राहणारे दीप पेवत असतो. यात अखंड टाळीला विशेष महत्त्व आहे. भजनासाठी गावातील लोकांच्या भजनी मंडळीचे चार गट पाडले आहेत. जे चारचार तासांच्या पाळीत भजन गातात. याशिवाय तुळशीचे जय हनुमान भजनी मंडळ म्हणून आमंत्रित भजनी मंडळ म्हणून यात दरवर्षी सहभागी होतात. या भजनी मंडळातील कलावंतांना तसेच १५० वर लोकांना येथीलच दानशूर व्यक्ती सप्ताहाच्या प्रत्येक दिवशी सायंकाळी स्वखर्चाने जेवण देतात. शेवटच्या दिवसाला संपूर्ण गावाला जेवण दिल्या जाते. सुरुवातीला तुळशी, पोटगाव, विसोरा, शिवराजपूर, नैनपूर, किन्हाळा, उसेगावचे भजनी मंडळ दिंडीसह येतात.