जमीन हडपून फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक करा
By Admin | Updated: September 20, 2015 02:01 IST2015-09-20T02:01:53+5:302015-09-20T02:01:53+5:30
शेतजमीन खरेदी करताना आपल्या मर्जीतील साक्षिदार उभे करून विक्री पत्र करून शेतीचा करारनामा न करता शेतीची पाच लाख रूपये किमत ठरविली.

जमीन हडपून फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक करा
असाहयतेचा फायदा उचलला : पोलिसांनी कारवाई करण्याची हनुजी निंबोळ यांची मागणी
गडचिरोली : शेतजमीन खरेदी करताना आपल्या मर्जीतील साक्षिदार उभे करून विक्री पत्र करून शेतीचा करारनामा न करता शेतीची पाच लाख रूपये किमत ठरविली. वेगवेगळ्या दिवशी चार टप्प्यात केवळ १ लाख ५० हजार रूपये दिले व उर्वरित रक्कम बँकेत फिक्समध्ये टाकले म्हणून शेतीच्या खरेदीची रक्कम पूर्ण न देता शेती हडपणाऱ्या आरोपी टेंभा येथील नरेंद्र गोविंदा ठाकरे यांना अटक करावी, अशी मागणी चांभार्डा येथील शेतकरी हनुजी शिवा निंबोळ यांनी केली आहे.
हनुजी निंबोळ यांनी म्हटले आहे की, सेबीने काळ्या यादीत टाकलेल्या एका कंपनीचा एजंट असलेल्या नरेंद्र ठाकरे याने २४ मार्च २०१५ रोजी आपली शेतजमीन त्यांनी स्वत:च्या पत्नीच्या नावे खरेदी केली. खरेदी करताना आपल्या मर्जीतील साक्षिदार उभे करून विक्रीपत्र करून घेतले. शेतीचा करारनामा न करता पाच लाख रूपये किमत ठरवून वेगवेगळ्या दिवशी चार टप्प्यात केवळ १ लाख ५० हजार रूपये दिले. उर्वरित रक्कत बँकेत फिक्समध्ये टाकले म्हणून काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या कंपनीच्या पावत्या दिल्या. सदर बँकेची चौकशी केली असता, सेबीने जाहीर केलेली बोगस कंपनी आहे, असे आढळून आले. त्यानंतर नरेंद्र ठाकरे यांच्याशी पैशाबाबत विचारणा केली असता, तुम्हाला जे जमते ते करून घ्या, अशी धमकी दिली. जमीन खरेदीतील उर्वरित रक्कमेची गुंतवणूक करताना आरोपीने आपली परवानगी घेतली नाही व परस्पर गुंतवणूक करून फसवणूक केली. या घटनेची तक्रार आरमोरी पोलीस ठाण्यात जून २०१५ मध्ये दिली असता, पोलिसांनी थातूरमातूर चौकशी करून आपल्याला पोलीस ठाण्यातून हाकलून लावले. त्यानंतर पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्याकडे तक्रार दिली असता, १४ जुलै २०१५ रोजी नरेंद्र ठाकरे याच्यावर ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र आरमोरी पोलीस ठाण्याचे निरिक्षक यांनी आरोपीवर गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ केली. यावरून आरमोरी पोलीस कुणाच्या तरी दबावाखाली वागत आहेत, असे दिसून येत आहे. आरोपीवर गुन्हा नोंदविण्यासंबंधी चौकशी केली असता, आम्ही तपास करीत आहोत, असे सांगण्यात येत आहे. आरोपीवर गुन्हा दाखल होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही त्याला अद्यापही अटक करण्यात आली नाही. आरोपीने बोगस कंपनीत पैशाची गुंतवणूक करून शेती हडप करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्याला तत्काळ अटक करावी, अशी मागणी हनुजी निंबोळ यांनी केली आहे. आरोपीस अटक न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही निंबोळ यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)