बँकेच्या रांगेतील वृध्दांना मदतीचे चिमुकले हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2016 01:58 IST2016-11-19T01:58:09+5:302016-11-19T01:58:09+5:30
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी १००० व ५०० च्या नोटा बाद केल्या.

बँकेच्या रांगेतील वृध्दांना मदतीचे चिमुकले हात
नोटा बंदीत बँकेत दिली सेवा : प्लॅटीनम ज्युबिली शाळेचा उपक्रम
गडचिरोली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी १००० व ५०० च्या नोटा बाद केल्या. त्यानंतर देशभरातील बँकांमध्ये या नोटा जमा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या. ही परिस्थिती गडचिरोली शहरातील अनेक बँकात दिसून आली. या गर्दीत वृध्द महिला, पुरूष तसेच ग्रामीण भागातून आलेले अशिक्षीत नागरिक यांचाही समावेश होता. या नागरिकांच्या मदतीसाठी प्लॅटीनम ज्युबिली हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी सरसावले. गेल्या १० दिवसांपासून हे विद्यार्थी भारतीय स्टेट बँक, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये जाऊन अशा आबाल वृध्द ग्राहकांना पावती भरण्यासाठी मदत करीत आहे. त्यांच्या कागदपत्राच्या झेरॉक्सही काढून आणून देण्यासाठी या विद्यार्थ्यांची मदत आबाल वृध्द व अशिक्षीत ग्राहकांना होत आहे. अनेक ग्राहकांना बँकेत गेल्यावर जुने चलन जमा करण्यासाठी कोणते फार्म भरावे लागतात याची माहिती नाही. हे शाळकरी मुले सदर नागरिकांना मदत देत आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी ग्राहकांना शुध्द पिण्याचे पाणीही उपलब्ध करून देण्याचे काम या विद्यार्थ्यांनी केले. बँकांच्या शाखांमध्ये या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचा फलक लावून वई आॅफर अवर हेल्प असा संदेश लिहिला आहे. बँकेत येणाऱ्या अशा ग्राहकांना सदर विद्यार्थी गर्दीत सेवा देत आहे. शाळेचे मुख्याध्यापक रहिम अमलानी यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. बँकातील गर्दी आटोक्यात येईपर्यंत आबाल वृध्द ग्राहक, महिला ग्राहक आदींना हे विद्यार्थी मदत देतील, अशी माहिती रहिम अमलानी यांनी लोकमतशी बोलताना शुक्रवारी दिली. जवळजवळ गेल्या १० दिवसात ५०० वर अधिक ग्राहकांना या विद्यार्थ्यांकडून सेवा मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.