समान संधीसाठी अपंग विद्यार्थी व पालक रस्त्यावर
By Admin | Updated: February 2, 2015 23:05 IST2015-02-02T23:05:33+5:302015-02-02T23:05:33+5:30
अपंग विद्यार्थ्यांना अपंग व्यक्ती समान संधी कायदा १९९५ व २००९ च्या आरटीई कायद्यानुसार अपंग व विशेष गरजाधारक विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व सोयीसुविधा पुरविण्यात याव्या,

समान संधीसाठी अपंग विद्यार्थी व पालक रस्त्यावर
गडचिरोली : अपंग विद्यार्थ्यांना अपंग व्यक्ती समान संधी कायदा १९९५ व २००९ च्या आरटीई कायद्यानुसार अपंग व विशेष गरजाधारक विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व सोयीसुविधा पुरविण्यात याव्या, या प्रमुख मागणीला घेऊन विशेष शिक्षण विशेष गरजाधारक विद्यार्थी, पालक संघाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. अपंग विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन केले.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या तसेच खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये अपंग विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र कायद्यानुसार अपंग व विशेष गरजाधारक व विद्यार्थ्यांना पुरेशा सोयीसुविधा पुरविल्या जात नाही. विशेष गरजाधारक अपंग विद्यार्थ्यांसाठी अपंगांच्या शाळांमध्ये अपंग विशेष शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र जि. प. शाळांमध्ये अपंग विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे विशेष शिक्षक नाही. त्यामुळे अपंग विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास खुंटत आहे, असा आरोपही पालकांनी आंदोलनादरम्यान केला. त्यानंतर अपंग विद्यार्थ्यांच्या पालक शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांच्याकडे निवेदन दिले. पालक व जिल्हाधिकारी यांच्यात समस्यांबाबत १५ मिनीट चर्चा झाली. अपंग विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी शिष्टमंडळाला दिले. दिलेल्या निवेदनात अपंग विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण मिळावे, अपंग विद्यार्थ्यांसाठी अपंग विशेष शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी अपंगाचे शिक्षण घेतलेल्या शिक्षकांची नियुक्ती करावी, अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अनुकूलित अभ्यासक्रम व पाठ्यक्रम तयार करण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश आहे. या आंदोलनात आनंदराव बारसागडे, राहुल इजगिलवार, रवींद्र कत्रोजवार, सुधीर बांबोळे, रिना बेलखेडे, नीलकंठ नेवारे, एकनाथ बोधलकर, मनोहर कोहळे, दिवाकर भोयर, राजेंद्र चौधरी, ज्योती डुंबरे, माणिक राऊत, विलास मेश्राम, संगीता लांजेवार, रवींद्र चौधरी आदी पालकांसह अपंग विद्यार्थी सहभागी झाले होते. (स्थानिक प्रतिनिधी)