बसवा राजूचा मृतदेह ताब्यात द्या; नक्षलनेत्याच्या नातेवाइकांची विनंती, आंध्र प्रदेशात याचिका
By गेापाल लाजुरकर | Updated: May 25, 2025 19:28 IST2025-05-25T19:28:39+5:302025-05-25T19:28:51+5:30
न्यायालय म्हणते, छत्तीसगड पाेलिसांकडे मागणी करा

बसवा राजूचा मृतदेह ताब्यात द्या; नक्षलनेत्याच्या नातेवाइकांची विनंती, आंध्र प्रदेशात याचिका
गडचिरोली : भाकपा (माओवादी)चा सरचिटणीस तथा नक्षल्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशवराव ऊर्फ बसवा राजू याचा खात्मा २१ मे राेजी छत्तीसगड राज्यातील अबुझमाड जंगलातील चकमकीत झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात न आल्याने नातेवाइकांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात दाेन याचिका दाखल करीत मृतदेह ताब्यात देण्याची विनंती केली. या याचिकेवर शनिवार, २४ मे रोजी सुनावणी झाली. न्यायालयाने छत्तीसगड पाेलिसांकडे मृतदेहासाठी मागणी करावी, असे मत नाेंदवित याचिका निकाली काढली.
छत्तीसगडमधील अबुझमाड जंगल परिसरात २७ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला हाेता. यात बसवा राजूचाही समावेश हाेता. बसवा राजूच्या खात्म्यानंतर त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कुटुंबीयांनी धडपड सुरू हाेती. मात्र, शवविच्छेदनासह इतर तपासण्यांचे कारण देत त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आलेला नव्हता. छत्तीसगड पाेलिसांकडून हाेत असलेला विलंब लक्षात घेऊन बसवा राजूच्या नातेवाइकांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात दाेन याचिका दाखल करीत मृतदेह ताब्यात देण्याची विनंती केली.
महाधिवक्ता म्हणतात... मृतदेह लवकरच देणार
शनिवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू जाणून घेत याचिकाकर्त्यांना मृतदेहासाठी छत्तीसगड पोलिस प्रशासनाकडे मागणी करण्याची सूचना केली. यावेळी छत्तीसगडच्या महाधिवक्त्यांनीही लवकरच शवविच्छेदन आणि तपासणी पूर्ण होणार असल्याचे सांगून मृतदेह कुटुंबीयांना सुपूर्द करणार, असे न्यायालयात सांगितले.
अंत्ययात्रा उत्सवाची पाेलिसांना धास्ती?
गडचिरोली जिल्हा व छत्तीसगड राज्यात नक्षलवाद्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सोपविल्यानंतर शांततेत अंत्यसंस्कार पार पाडले जातात. मात्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये मृत नक्षल नेत्यांची अंत्ययात्रा वाजतगाजत, गाणी गात काढली जाते. सामान्य लाेकांसह समविचारी राजकीय पुढारीसुद्धा अंत्ययात्रेत माेठ्या संख्येने सहभागी हाेतात. उत्सवाप्रमाणे अंत्यविधी पार पाडला जाताे. गत महिन्यात महिला नक्षलीच्या अंत्ययात्रेचे फाेटाे व व्हिडीओ साेशल मीडियावर व्हायरल झाले हाेते. बसवा राजू हा माेठा नक्षली नेता असल्याने कदाचित याचीच धास्ती पाेलिसांना असावी, असाही कयास लावला जात आहे.