अतिक्रमणातील दुकानांवर हातोडा

By Admin | Updated: July 5, 2017 01:15 IST2017-07-05T01:15:08+5:302017-07-05T01:15:08+5:30

नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने मंगळवारी स्थानिक लक्ष्मी गेटजवळील बालोद्यानाच्या डाव्या बाजुचे अतिक्रमण हटविले.

Hammer at the encroachers shops | अतिक्रमणातील दुकानांवर हातोडा

अतिक्रमणातील दुकानांवर हातोडा

चामोर्शीत कारवाई : पक्की दुकाने जेसीबीने पाडली
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने मंगळवारी स्थानिक लक्ष्मी गेटजवळील बालोद्यानाच्या डाव्या बाजुचे अतिक्रमण हटविले. अतिक्रमणाची मोहीम सुरू होताच स्थानिक अतिक्रमीत दुकानदारांमध्ये धडकी भरली आहे. बुधवारी लक्ष्मी गेटच्या उजव्या बाजूचे अतिक्रमण हटविले जाणार आहे.
चामोर्शी शहरातील रस्त्याच्या दूतर्फा किरकोळ विक्रेते दुकानदारांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली होती. काही दुकानदारांनी तर पक्के बांधकामही केले होते. अतिक्रमणावर नियंत्रण नसल्याने दोन्ही बाजुने अतिक्रमणाचा विस्तार होत होता. अतिक्रमण रस्त्याच्या बाजुला पुढे सरकायला लागले होते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. अतिक्रमणामुळे चामोर्शी शहरात अपघातांचे प्रमाणही वाढले होते. चामोर्शी हा मध्यवर्ती तालुकास्थळ आहे. त्यामुळे या शहरात जिल्हाभरातून अनेक बसेस येतात. खासगी वाहनांचीही गर्दी राहत असल्याने अनेकवेळा वाहतुकीच्या कोंडीची समस्या निर्माण होत होती. नगर पंचायतीने अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून अतिक्रमण काढण्याविषयी बजाविले होते. मात्र दुकानदारांनी अतिक्रमण काढले नाही. त्यामुळे नगर पंचायतीने स्वत:च अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली. अतिक्रमण हटविण्यासाठी जेसीबी मशीन दाखल होताच अतिक्रमणधारकांनी स्वत:च अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली. काही दुकानदारांनी पक्के अतिक्रमण केले होते. सदर अतिक्रमण जेसीबी मशीनच्या सहाय्याने काढण्यात आले. कारवाई सुरू झाल्यानंतर बसस्थानक, लक्ष्मी गेट, मुख्य रस्त्याच्या बाजुला असलेली फळ व चायनिज दुकानदारांनी स्वत:हून अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली.

अतिक्रमणामुळे वाहनधारक होते कमालीचे त्रस्त
चामोर्शी शहरातील रस्त्यांच्या दोन्ही बाजुला असलेले अतिक्रमण वाहनधारकांसासाठी त्रासदायक बनले होते. या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात यावे, अशी मागणी वेळोवेळी नागरिकांकडून केली जात होती. त्यामुळे नगर पंचायतीने अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे.

अतिक्रमणामुळे चामोर्शी शहरात वाहतुकीची कोंडी होत होती. त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त होते. म्हणूनच नगर पंचायतीने अतिक्रमण हटविण्याची कारवाई हातात घेतली. ही मोहीम यापुढेही चालू राहणार आहे. बुधवारी उजव्या बाजुचे अतिक्रमण हटविले जाणार आहे. दुकानदारांनी अतिक्रमण करू नये.
- अर्शिया जुही, मुख्याधिकारी
नगर पंचायत चामोर्शी

Web Title: Hammer at the encroachers shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.