अर्धवट पुलाने रहदारीस अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 01:07 IST2018-02-11T01:07:02+5:302018-02-11T01:07:16+5:30
एटापल्ली ते भामरागड या दोन तालुकास्थळातील अंतर ७० ते ७५ किमी आहे. हे ७५ किमीचे अंतर गाठण्यासाठी कोठी ते गट्टादरम्यान दोन पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले.

अर्धवट पुलाने रहदारीस अडथळा
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : एटापल्ली ते भामरागड या दोन तालुकास्थळातील अंतर ७० ते ७५ किमी आहे. हे ७५ किमीचे अंतर गाठण्यासाठी कोठी ते गट्टादरम्यान दोन पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले. मात्र तब्बल दोन दशकापासून या दोन्ही पुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे या दोन तालुक्याची रहदारी होण्यासाठी प्रचंड अडचण निर्माण झाली आहे. परिणामी या दोन तालुक्याचा थेट संबंध प्रस्तापित होण्यास आडकाठी निर्माण झाली आहे.
भामरागड तालुक्यातून एटापल्ली तालुक्यात जाण्यासाठी कोठी व गट्टा हे दोन मोठे गाव पडतात. भामरागडपासून कोठी हे गाव २० किमी अंतरावर आहे. कोठीपर्यंत नियमितपणे अहेरीवरून राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा सुरू आहे. तर अहेरी, एटापल्लीवरून गट्टापर्यंत ३५ ते ४० किमी अंतरापर्यंत बससेवा नियमितपणे सुरू आहे. केवळ गट्टा-कोठी दरम्यान १५ ते १८ किमी रस्त्यामध्ये दोन पुलाचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे एटापल्ली ते भामरागड या दोन तालुक्याचा संपर्क मार्गात वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. उन्हाळ्यात पेपरमिल सुरू होताच रस्त्याची दुरूस्ती केली जाते. अन्यथा १२ महिने सदर रस्त्यावरील वाहतूक बंद राहते. त्यामुळे आलापल्लीवरून एटापल्लीला जाण्यासाठी अधिकचे अंतर कापावे लागते. कोठी व गट्टा या दोन नाल्यावरील पुलाच्या बांधकामास सन १९९६-९७ मध्ये मंजुरी मिळाली. बीआरओच्या माध्यमातून या पुलाचे काम सुरू करण्यात आले. बीआरओ निघून गेल्यानंतर या पुलाचे बांधकाम पुन्हा हाती घेण्यात आले नाही. यानंतर सदर पुलाच्या बांधकामाबाबत प्रशासनाने पुढाकार घेतला नाही. एकूणच रस्ता व पूल निर्मितीच्या कामात भामरागड तालुक्यावर सातत्याने अन्याय होत आहे.
नागरिकांवर पडतो आर्थिक भुर्दंड
कोठी-गट्टा दरम्यान मार्गावरील दोन्ही पुलाचे काम गेल्या दोन दशकापासून अर्धवट स्थितीत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना भामरागड व एटापल्लीला येण्यासाठी अधिकचे अंतर कापून यावे लागते. यासाठी प्रवासापोटी अधिक पैसे मोजावे लागतात. कोठी ते एटापल्ली मार्गावरील कारमपल्ली, हलवेर, कोयर, पिडमिली आदी परिसरातील नागरिकांना आलापल्लीवरून अधिकचे अंतर कापून तालुका मुख्यालयी यावे लागते. तसेच गट्टा, जांभिया, अडेंगा, सुरजागड, मंगेर, हेडरी, नेंडेर, परसलगोंदी, आलदंडी, तुमरगुंडा, वांगेतुरी, तोडगट्टा, आरेवाडा परिसरातील नागरिकांना एटापल्ली, आलापल्लीवरून भामरागडला यावे लागते.