अहेरी कृषी उपविभागात निम्मी पदे रिक्त

By Admin | Updated: March 6, 2016 01:15 IST2016-03-06T01:15:46+5:302016-03-06T01:15:46+5:30

नक्षली कारवायांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या अहेरी उपविभागात कृषी विभागांतर्गत ५१ टक्के पद रिक्त असल्यामुळे कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी मंदगतीने सुरू आहे.

Half posts vacant in Aheri Agriculture Subdivision | अहेरी कृषी उपविभागात निम्मी पदे रिक्त

अहेरी कृषी उपविभागात निम्मी पदे रिक्त

शेतकऱ्यांची परवड : योजनांच्या अंमलबजावणीस अडचण
ए. आर. खान अहेरी
नक्षली कारवायांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या अहेरी उपविभागात कृषी विभागांतर्गत ५१ टक्के पद रिक्त असल्यामुळे कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी मंदगतीने सुरू आहे. याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत असून शासनाचे कृषी विभागातील पद भरण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. अहेरी उपविभागांतर्गत येणाऱ्या अहेरी, सिरोंचा, एटापल्ली व भामरागड या चारही तालुक्यांमध्ये कृषी सहायकांची पदे भरणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील ९० टक्के जनता शेतीचा व्यवसाय करते. त्यामुळे इतर विभागांच्या तुलनेत कृषी विभागाला विशेष महत्त्व आहे. शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या शेतकरी हिताच्या योजना राबविण्याबाबत शेतकऱ्यांना योग्यवेळी मार्गदर्शन करण्याची महत्त्वाची जबाबदारी कृषी विभागावर आहे. मात्र या विभागातील निम्मी पदे रिक्त असल्याने सदर विभाग पंगू झाला आहे. अहेरी उपविभागात अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा या चार तालुक्यांचा समावेश आहे. या चारही तालुक्यात कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सुमारे १७५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ ८९ पदे भरण्यात आली असून सुमारे ८६ पदे रिक्त आहेत.
चारही तालुक्यांची लोकसंख्या कमी असली, तरी विस्ताराने हे तालुके मोठे आहेत. त्यामुळे एका कर्मचाऱ्याला १५ ते २० किमीच्या परिघातील गावांचा कारभार सोपविण्यात आला आहे. कृषी विभागातील ही पदे मागील तीन ते चार वर्षांपासून रिक्त आहेत. मात्र ही पदे भरण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी कोणताही पाठपुरावा करीत नसल्याने रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एखादा कर्मचारी किंवा अधिकारी बदलून गेल्यानंतर ती जागा खाली होते. मात्र त्या ठिकाणी दुसऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची नेमणूक केली जात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. हा प्रकार असाच यापुढेही सुरूच राहिल्यास कृषी विभागातील रिक्त पदांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे.

कृषी सहायकांची २४ पदे रिक्त
कृषी सहायकांची अहेरी तालुक्यात १३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १० पदे भरण्यात आली असून तीन पदे रिक्त आहेत. एटापल्ली तालुक्यात २५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ९ पदे रिक्त आहेत. भामरागड तालुक्यात १३ पैकी ७ पदे रिक्त आहेत. तर सिरोंचा तालुक्यात १३ पैकी ४ पदे रिक्त आहेत. चारही तालुक्यांसाठी एकूण ६७ पदे मंजूर असून त्यापैकी २४ पदे रिक्त आहेत. शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचून त्यांना लागवडीबाबत मार्गदर्शन करण्याचे काम कृषी सहायकांच्या मार्फतीने केले जाते. मात्र ही पदेसुद्धा रिक्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शनापासून वंचित राहावे लागत आहे.

रोजंदारी वाहनचालक
चारही तालुक्यांमधील कृषी योजनांचा आढावा घेण्याची महत्त्वाची जबाबदारी उपविभागीय कृषी अधिकारी यांच्यावर आहे. वेगवेगळ्या भागात दौरे करून पिकांची पाहणी करण्यासाठी चारचाकी सुमो वाहन या कार्यालयाला उपलब्ध करून दिली आहे. मात्र त्याला कायमस्वरूपी वाहनचालक देण्यात आला नाही. त्यामुळे रोजंदारीने वाहनचालक नेमून काम भागविले जात आहे. वाहनचालकाची भरती करण्यात यावी, याबाबत अनेक वेळा पाठपुरावा करूनही त्याला यश प्राप्त झालेले नाही.

अहेरी तालुक्यात ३३ पैकी २० पदे रिक्त
अहेरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत कृषी पर्यवेक्षक, सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, अनुरेखक, कृषी सहायक, वाहनचालक, शिपाई यांची एकूण ३३ पदे रिक्त आहेत. त्यापैकी केवळ १३ पदे भरण्यात आली असून सुमारे २० पदे रिक्त आहेत. एटापल्ली तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मंजूर ५० पदांपैकी २२ पदे रिक्त आहेत. भामरागड तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ३२ पैकी १८ पदे रिक्त आहेत तर सिरोंचा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ३३ पैकी १५ पदे रिक्त आहेत.

Web Title: Half posts vacant in Aheri Agriculture Subdivision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.