हळदवाही-रेगडी सर्कलने दिली अनेकदा बाहेरच्या उमेदवारालाच संधी
By Admin | Updated: February 10, 2017 02:14 IST2017-02-10T02:14:51+5:302017-02-10T02:14:51+5:30
चामोर्शी तालुक्यातील हळवादी-रेगडी जिल्हा परिषद मतदार संघ नेहमीच अपक्ष व बाहेरील उमेदवारांना अधिक संधी देत आला आहे.

हळदवाही-रेगडी सर्कलने दिली अनेकदा बाहेरच्या उमेदवारालाच संधी
प्रवीण खेडकर भाडभिडी
चामोर्शी तालुक्यातील हळवादी-रेगडी जिल्हा परिषद मतदार संघ नेहमीच अपक्ष व बाहेरील उमेदवारांना अधिक संधी देत आला आहे. मागील पाच निवडणुकांपैकी तीन निवडणुका अपक्ष व बाहेरच्या उमेदवारांनी येथून बाजी मारली. दोनवेळा क्षेत्रातील गावांमधील उमेदवार विजयी झाले आहे. काँग्रेसला एकदा तर भाजपला एकदा व तिनवेळा अपक्षांना जिल्हा परिषदेमध्ये संधी मिळाली.
या क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकदाही विजय मिळविता आला नाही. मात्र २००७ व २०१२ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने या क्षेत्रात उमेदवार मैदानात उतरविलेला नाही. १९९२ मध्ये जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यानंतर पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत अपक्ष उमेदवार डॉ. नंदू अध्येंकिवार हे निवडून आलेत. ते घोटचे रहिवासी होते व क्षेत्राबाहेरचे होते. त्यानंतर १९९७ च्या निवडणुकीत मक्केपल्ली येथील रामा बारसागडे हे काँग्रेसच्या तिकीटावर विजयी झाले. त्यानंतर २००२ च्या निवडणुकीत क्षेत्राबाहेरील चामोर्शीचे गजेंद्र गण्यारपवार भाजपच्या तिकीटावर निवडून आलेत. त्यानंतर २००७ च्या निवडणुकीत क्षेत्राबाहेरील ताईबाई कोवासे या अपक्ष म्हणून निवडून आल्या. २०१२ च्या निवडणुकीत सुद्धा बाहेरचाच अपक्ष उमेदवार नामदेव सोनटक्के निवडून आलेत. ते घोटचे रहिवासी आहेत.
जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून पाच पैकी तीन निवडणुका अपक्षांनी तर दोन निवडणुका राजकीय पक्षांनी जिंकल्या. यावेळी माजी खा. मारोतराव कोवासे यांचे पुतणे प्रेमानंद कोवासे हे काँग्रेसकडून मैदानात आहे. भाजपकडून मीणा विलास कोडाप व जनसेवा विकास मंचकडून सुधाकर पोटावी मैदानात आहेत.
हळदवाही-रेगडी जि. प. क्षेत्र अनुसूचित जमाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असून या क्षेत्रामध्ये हळदवाही, भाडभिडी (बि.) पावीमुरांडा, चापलवाडा, रेगडी, विकासपल्ली, माडेआमगाव, माल, मक्केलपल्ली चक १, मक्केपल्ली माल, शिमुलतला आदी ग्रामपंचायती समाविष्ट आहे. हळदवाही-रेगडी जि. प. क्षेत्रात १२ हजार २०० मतदार आहे. हळदवाही पं. स. गणात ५ हजार ८०४ तर रेगडी गणात ६ हजार ३९६ मतदार आहे. १७ हजार ३०५ लोकसंख्या असून १ हजार ३०२ अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.