गुरूजी, कर्जाचे हप्ते केव्हा देता!
By Admin | Updated: September 16, 2014 23:43 IST2014-09-16T23:43:12+5:302014-09-16T23:43:12+5:30
शासनाकडून प्रशासन गतिमान करण्याचा कांगावा होत असला तरी याला अनेक शासकीय कार्यालये अपवाद आहेत. शासकीय कार्यालयातील दिरंगाईचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसत आहे.

गुरूजी, कर्जाचे हप्ते केव्हा देता!
पं.स. कार्यालयाकडून दिरंगाई : गुरूजींचे खणखणताहेत भ्रमणध्वनी
गडचिरोली : शासनाकडून प्रशासन गतिमान करण्याचा कांगावा होत असला तरी याला अनेक शासकीय कार्यालये अपवाद आहेत. शासकीय कार्यालयातील दिरंगाईचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसत आहे. येथील पंचायत समिती कार्यालयातील लेखा विभागाच्या दिरंगाईपणामुळे शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे. त्यामुळे ‘गुरूजी, कर्जाचे हप्ते केव्हा देता’ अशा वक्तव्यांचे भ्रमणध्वनी अनेक शिक्षकांना बँकांच्या अधिकाऱ्यांकडून येत आहे. पंचायत समितीच्या भोंगळ कारभारामुळे बँकांच्या अधिकाऱ्यांचे फोन वारंवार शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांना येत असल्याची माहिती अनेक शिक्षकांनी ‘लोकमत’ला दिली आहे.
गडचिरोली शहरातील तसेच तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अनेक राष्ट्रीयकृत तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून गृहकर्ज तसेच वाहनकर्ज घेतले आहे. सदर कर्ज घेताना प्रस्तावासोबत वेतन देयकही जोडण्यात आले आहे. या कर्जाच्या हप्त्याची भरपाई थेट दरमहा वेतनातून केली जाते. यासाठी पंचायत समिती कार्यालयाकडून कर्जधारक कर्मचाऱ्यांच्या संबंधीत हप्त्याच्या रक्कमेचा डीडी बँकांना पाठविला जातो. मात्र सदर बँकांच्या कर्जाच्या हप्त्याचे डिमांड ड्राप्ट पाठविण्यासाठी पंचायत समितीकडून विलंब होत आहे. यामुळे कर्जाच्या हप्त्यासाठी अनेक शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी वारंवार खणखणत आहेत.
मार्च एन्डींगच्यावेळी बँकांच्या व्यवहारामध्ये प्रचंड गती आलेली असते. वर्षभराचा हिशोब अद्यावत करण्यासाठी बँकांचे अधिकारी व कर्मचारी कामाला जोमात भिडलेले असतात. मात्र अशाही वेळी पंचायत समितीकडून कर्जधारक शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांचे हप्त्याच्या रक्कमाचे डिमांड ड्राप्ट वेळेवर पाठविल्या जात नाही. त्यामुळे मार्च एन्डींगच्या कालावधीत कर्जधारक कर्मचाऱ्यांना बँकांच्या अधिकाऱ्यांकडून भ्रमणध्वनीद्वारे वारंवार विचारणा केली जाते. पं. स. प्रशासनाने या कारभारात सुधारणा करण्याची मागणी होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)