पालकमंत्र्यांनी थांबविले उद्घाटन
By Admin | Updated: December 15, 2015 03:27 IST2015-12-15T03:27:43+5:302015-12-15T03:27:43+5:30
येथील इंदिरा गांधी चौकात महिला व बाल रुग्णालयाची वास्तू उभी झाली आहे. या रुग्णालयाचे उद्घाटन २२ डिसेंबर रोजी

पालकमंत्र्यांनी थांबविले उद्घाटन
गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात महिला व बाल रुग्णालयाची वास्तू उभी झाली आहे. या रुग्णालयाचे उद्घाटन २२ डिसेंबर रोजी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते करण्यात येणार होते. परंतु पदभरती न करता उद्घाटन करणे योग्य होणार नाही, त्यामुळे आधी डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध करा, त्यानंतर उद्घाटन करा, अशी विनंती पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी आरोग्यमंत्र्यांना केली. त्यामुळे २२ डिसेंबर रोजी होणारा उद्घाटन सोहळा आता लांबणीवर पडणार आहे. याबाबत शनिवारी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी पत्रकार परिषदेत याबाबत दुजोरा दिला.
रुग्णालयाचे उद्घाटन झाले व डॉक्टर, कर्मचाऱ्यांची पदे भरती झाली नाही, तर इमारत काही रुग्णांवर उपचार करणार नाही, त्यामुळे पेशंटलाही त्रास होईल, ही बाब लक्षात घेऊन आपण उद्घाटन सोहळा रोखला, ही बाब पालकमंत्र्यांनी स्पष्ट केली. या रुग्णालयासाठी नवे १५० वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी लागणार आहे. विद्यमान स्थितीत जिल्ह्यात १०० वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असताना नवी पदभरती कशी होईल, हाही एक प्रश्न असून या रुग्णालयाचे उद्घाटन आणखी किती काळ रखडते, हे येणारा काळच सांगेल. (जिल्हा प्रतिनिधी)