पालकमंत्र्यांनी गोदावरी नदीच्या सिरोंचा घाटाकडे फिरविली पाठ
By Admin | Updated: July 27, 2015 03:11 IST2015-07-27T03:11:41+5:302015-07-27T03:11:41+5:30
पुष्कर पर्वानिमित्त सिरोंचा तालुक्याच्या गोदावरी घाटावर अनेक भाविक येऊन स्नान करतात. मात्र राज्य शासनाने या

पालकमंत्र्यांनी गोदावरी नदीच्या सिरोंचा घाटाकडे फिरविली पाठ
सिरोंचा : पुष्कर पर्वानिमित्त सिरोंचा तालुक्याच्या गोदावरी घाटावर अनेक भाविक येऊन स्नान करतात. मात्र राज्य शासनाने या ठिकाणी कोणत्याही सोयी- सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम जबाबदार असून त्यांनी सिरोंचा तालुक्याच्या गोदावरी घाटाला भेट देण्याऐवजी तेलंगणातल्या धर्मपुरी येथे गेले व तिथे पूजा केली, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सिरोंचा तालुकाध्यक्ष सतीश भोगे यांनी केला आहे.
तेलंगणा सरकारने सिरोंचाला लागून असलेल्या कालेश्वर या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी ४० कोटी रूपये खर्च केले. पुष्कर मेळाव्यानिमित्त तेलंगणा सरकारने योग्य नियोजन केले होते. त्यामुळेच कालेश्वरला मागील दहा दिवसांत २५ लाख भाविकांनी भेट दिली आहे. पुष्कर निमित्ताने सिरोंचा तालुक्यातील पर्यटन क्षेत्रांची तसेच तीर्थक्षेत्रांची जाहिरात करण्याची चांगली संधी निर्माण झाली होती. गोदावरील नदीघाटावर सिरोंचा तालुक्यात नगरम, चिंतलपल्ली, आरडा, सोमनूर हे नदीघाट आहेत. जे भाविक नाशिकला जात नाही. ते सिरोंचा येथे येऊ शकले असते. आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून स्वत:चे राजकीय वजन वापरून निधी आणला असता व सोयी- सुविधा निर्माण केल्या असत्या तर कालेश्वरप्रमाणेच सिरोंचा घाटांवरही गर्दी जमली असती.
तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी केवळ आठ दिवसांत निधी मंजूर करून सोयी- सुविधा पुरविल्या होत्या. मात्र सध्याचे पालकमंत्री आत्राम यांनी निधी उपलब्ध करून न दिल्याने भाविकांमध्ये नाराजी आहे. या नाराजीची कल्पना असल्यानेच पालकमंत्र्यांनी तेलंगणातील धर्मपुरी येथे जाऊन पूजा केली. भविष्यात तरी सिरोंचा तालुक्याच्या विकासाकडे पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी सतीश भोगे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)