पालकमंत्री व आमदारांचा लागणार कस

By Admin | Updated: October 12, 2015 01:43 IST2015-10-12T01:43:14+5:302015-10-12T01:43:14+5:30

गडचिरोली जिल्ह्यात नऊ नगर पंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. या निवडणुका लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतरच्या ..

Guardian Minister and MLAs need to | पालकमंत्री व आमदारांचा लागणार कस

पालकमंत्री व आमदारांचा लागणार कस

नगर पंचायत निवडणूक : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनाही मैदानात; अहेरी, चामोर्शी, कुरखेडा, सिरोंचात घमासान
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नऊ नगर पंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. या निवडणुका लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतरच्या महत्त्वाच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांवर भविष्यातील पाच वर्षांचे गडचिरोली जिल्ह्याचे राजकारण अवलंबून राहणार आहे. या निवडणुका गेल्या एक वर्षाच्या कार्यकाळात पालकमंत्री व जिल्ह्याचे दोन भाजप आमदार यांच्या कार्यप्रणाली व राज्य सरकारच्या विकास कामांप्रती असलेली जनभावना अधोरेखांकित करणारे आहे. त्यामुळे राजनगरी असलेल्या अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड नगर पंचायतीच्या निवडणुका पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्यासाठी महत्त्वाच्या आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने अम्ब्रीशराव आत्रामांची प्रतिष्ठा पणाला लागणार असून त्यांच्या कार्यपध्दतीवर मतदार संघातील व जिल्ह्यातील जनता खूश आहे की नाराज आहे, याचा फैसलाही या निवडणुकीतून होणार आहे. यापूर्वी अहेरी ग्रामपंचायतवर नाग विदर्भ आंदोलन समितीची अबाधित सत्ता होती. अहेरी राजनगरीतून आजवर अनेक राज्यमंत्री झालेत. परंतु अहेरी राजनगरची दशा मात्र पलटली नाही. विकासाची केवळ आश्वासने मिळाली. अद्याप विकासाचे खरे चित्र निर्माण झालेले नाही. ही जनमानसाची भावना आहे. आता नगर पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने अहेरीकरांना एक चांगले प्रशासन निवडण्याची संधी मिळाली असल्याने मतदार राजा या निवडणुकीत पालकमंत्र्यांच्या पक्षाला कौल देतो की नाही हे दिसून येईल. सिरोंचा येथेही भाजप, राकाँ, काँग्रेस, आविस यांच्यात थेट लढत आहे. त्यामुळे येथेही निवडणूक कसदार होणार आहे. या निवडणुकीसाठी पालकमंत्र्यांना परिश्रम घ्यावे लागणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील लोकसंख्येने मोठ्या असलेल्या चामोर्शी नगर पंचायतीच्या निवडणुकीत आमदार डॉ. देवराव होळी यांची प्रतिष्ठा भाजपच्या पॅनलसाठी पणाला लागलेली आहे. चामोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर तेली समाज तसेच ओबीसी समाज वास्तव्याला आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करू, पेसा अधिसुचनेत बदल करून आणू, असे जाहीर आश्वासन दिले होते. मात्र वर्षाचा कालावधी उलटला तरी हे दोनही प्रश्न सुटलेले नाही. काँग्रेसवर तोफ डागून भाजप या प्रश्नातून आपली सुटका करून घेण्याच्या हिशोबात आहे. त्यामुळे नगर पंचायत निवडणुकीत हा मुद्दा भाजपसाठी अडचणीचा ठरू शकतो. डॉ. देवराव होळी यांनी मागील वर्षभराच्या काळात काय विकासकाम केले याचाही लेखाजोखा मतदार या निवडणुकीच्या निमित्ताने तपासून पाहणार आहे. त्यामुळे त्यांचीही प्रतिष्ठा या निवडणुकीसाठी पणाला लागली आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रात कुरखेडा हे महत्त्वाचे ठिकाण आहे. या ठिकाणी भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना नगर पंचायत निवडणुकीच्या रिंगणात आहे. येथे भाजपला जोरदार मुसंडी मारण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. आमदार क्रिष्णा गजबे यांचा जनसंपर्क दांडगा असला तरी राजकारणात ते नवखे असल्याने मतदार राजा येथे कुणाला कौल देतो हे पहावे लागेल. एकूणच जिल्ह्यातील नऊही नगर पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने विद्यमान लोकप्रतिनिधींना चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे. पक्ष हारला तर त्याचे थेट पडसाद लोकप्रतिनिधी, आमदारांच्या परफारमन्सवर पडेल. त्यामुळे त्यांच्यासाठी चिंता अधिक आहे.

Web Title: Guardian Minister and MLAs need to

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.