धानाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत हमीभाव द्या
By Admin | Updated: July 24, 2016 01:32 IST2016-07-24T01:32:12+5:302016-07-24T01:32:12+5:30
अनियमित व अपुऱ्या पावसामुळे गडचिरोलीसह पूर्व विदर्भाच्या जिल्ह्यात दोन वर्षापासून धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

धानाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत हमीभाव द्या
लोकसभेत अशोक नेते यांची मागणी
गडचिरोली : अनियमित व अपुऱ्या पावसामुळे गडचिरोलीसह पूर्व विदर्भाच्या जिल्ह्यात दोन वर्षापासून धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने धानाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी शनिवारी लोकसभेत ३७७ च्या सूचनेंतर्गत केली.
सदर प्रश्नावर बोलताना खासदार नेते लोकसभेत म्हणाले, शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. त्यातच निसर्गाच्या लहरीपणामुळे व अत्यल्प पावसामुळे विदर्भाच्या पाच ते सहा जिल्ह्यात धानपिकाचे गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावर्षी उशीरा झालेल्या पावसामुळे धान पिकाचे पऱ्हे नष्ट झाले. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. सावकारी व बँकेचे कर्ज घेतल्याने शेतकऱ्यांचा शेतीमशागतीचा खर्च दुप्पट झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी शासनाने धान पिकाला हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी खासदार नेते यांनी केली. (प्रतिनिधी)