ग्रामीण भागात अवैधरीत्या शिकारी वाढल्या
By Admin | Updated: May 10, 2015 01:23 IST2015-05-10T01:23:03+5:302015-05-10T01:23:03+5:30
वन्य प्राण्यांच्या शिकारीला कायदेशीर बंदी आहे.़ देसाईगंज तालुक्यातील जंगल असलेल्या परिसरात मागील काही दिवसात वन्यप्राण्यांचा शिकारी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

ग्रामीण भागात अवैधरीत्या शिकारी वाढल्या
देसाईगंज : वन्य प्राण्यांच्या शिकारीला कायदेशीर बंदी आहे.़ देसाईगंज तालुक्यातील जंगल असलेल्या परिसरात मागील काही दिवसात वन्यप्राण्यांचा शिकारी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. वन्यप्राणी पाण्याच्या शोधार्थ गावाकडे धाव घेतात. परंतु या वन्यप्राण्यांवर कुत्रे व गावपरिसरातील शिकारीही हल्ले करतात. त्यामुळे वन्यजीव उन्हाळ्याच्या दिवसात शिकारी व कुत्र्यांच्या रडारवर असल्याचे चित्र आहे. परंतु संबंधित विभागाचे वन्यप्राण्यांच्या शिकारीकडे दुर्लक्ष असल्याचे अनेक घटनांवरून दिसून येते.
तालुक्यातील कोरेगाव येथे चार महिन्यांपूर्वी एक क्विंटल रान डुकराची मटन जप्त करण्यात आली होती़ मात्र क्षुल्लक शिक्षा होऊन शिकारी मोकाट झाले़ त्यामुळे शिकाऱ्यांची हिंमत दिवसेंदिवस वाढली चालली आहे. वन्यप्राण्यांच्या शिकारीमुळे गावात मुक्कामाला असलेल्या वनरक्षकांच्या उपस्थितीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरापासून १० किमी अंतरावर जंगलपरिसर आहे. कुरखेडा मार्गावर शंकरपूर तर आरमोरी मार्गावर कोंढाळापासून जंगलाची सुरूवात होते. तालुक्याचा ७० टक्के भूभाग जंगलाने व्यापलेला आहे़ अशा निसर्गसंपन्न वनराईला शिकाऱ्यांच्या टोळ्यांनी आपले उदरनिर्वाहाचे साधन बनविले आहे़ या टोळ्यांचे मुख्य लक्ष्य जंगली रानडुक्कर, सांबर, चितळ, मोर आहेत. रात्रीच्या वेळेस शिकार करून पहाटेच्या सुमारास गावातील नियोजित ठिकाणी मांस आणून विल्हेवाट लावली जात असल्याचेही अनेक नागरिकांचे म्हणणे आहे.