भूजल पातळी वाढली
By Admin | Updated: October 28, 2016 00:56 IST2016-10-28T00:56:45+5:302016-10-28T00:56:45+5:30
यावर्षी सरासरीच्या १३० टक्के पाऊस पडल्याने जिल्ह्यातील विहिरींची पाणी पातळी मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ०.०५ मीटरने वाढ झाली...

भूजल पातळी वाढली
११२ विहिरींची पाहणी : भूजल सर्वेक्षण विभागाचा निष्कर्ष
गडचिरोली : यावर्षी सरासरीच्या १३० टक्के पाऊस पडल्याने जिल्ह्यातील विहिरींची पाणी पातळी मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ०.०५ मीटरने वाढ झाली असल्याचे भूजल विभागाने तालुकानिहाय केलेल्या निरिक्षणातून दिसून आले आहे. या निरिक्षणामध्ये ११२ विहिरींच्या पाण्याची पातळी मोजण्यात आली आहे.
मागील वर्षी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती होती. जवळपास अर्धाच पाऊस पडल्याने आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यापासूनच विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली होती. उन्हाळ्यामध्ये ग्रामीण भागात प्रचंड पाणीटंचाई निर्माण झाली होती. वैनगंगेची पाणीपातळी अतिशय कमी झाल्याने याचा फटका काही दिवस गडचिरोेली शहरालासुद्धा बसला होता. यावर्षीच्या पावसाळ्यात मात्र पावसाने अगदी सुरुवातीपासून साथ दिली. सुरुवातीलाच अतिशय जोरदार पाऊस झाला. त्यानंतरही पाऊस सुरूच होता. मागील तीन वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत १३० टक्के पाऊस पडला. त्यामुळे मागील वर्षीच्या पाणी पातळीची कमतरता यावर्षीच्या पावसाने भरून काढली. भूजल सर्वेक्षण विभागाच्या मार्फतीने दर तीन महिन्याला निवडक ११२ विहिरींच्या पाण्याची पातळी तपासली जाते. त्यामध्ये मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत १८ विहिरींच्या पाण्याच्या पातळीमध्ये ०.४९ मीटर घट झाली आहे. तर सुमारे ९४ विहिरींच्या पाण्याच्या पातळीमध्ये ०.५४ मीटर वाढ झाली आहे. गडचिरोली तालुक्यात एकूण १० विहिरी आहेत. यापैैकी सर्वच विहिरींच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. इतरही तालुक्यांमधील बहुतांश विहिरींच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. या सर्व विहिरींची सरासरी काढली असता, मागील पाच वर्षांच्या तुलनेत पाण्याची पातळी वाढली असल्याचा निष्कर्ष भूजल सर्वेक्षण विभागाने काढला आहे. दरवर्षीच पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. याचाच अर्थ नागरिकांमध्ये भूजल संवर्धनाबाबत जागृती होत असल्याचे दिसून येत आहे. ही पाणी पातळी टिकवून ठेवण्याचे आव्हान नागरिक व प्रशासनाला सुद्धा पेलावे लागणार आहे. (नगर प्रतिनिधी)
जास्त पावसाचा परिणाम
यावर्षीच्या पावसाळ्यात आॅक्टोबर महिन्यापर्यंत सरासरीच्या १३० टक्के पाऊस पडला आहे. अगदी सुरुवातीपासूनच दमदार पाऊस झाल्याने पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आहे. त्याचबरोबर जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलसंवर्धनाची अनेक कामे केली जातात. त्यामुळे पावसाळ्यादरम्यान वाहून जाणारे पाणी काही प्रमाणात साचून राहून ते जमिनीमध्ये झिरपल्याने पाणी पातळी वाढण्यास फार मोठी मदत झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून शेततळे, तलाव व इतर पाणवठ्यांचे पुनर्जीवन झाल्याने भूगर्भातील पाण्याचा वापर कमी होण्यास मदत झाली. परिणामी भूजलाची पातळी वाढण्यासही मदत झाली आहे.
उत्तरेकडील तालुक्यांची पाणी पातळी घटली
जिल्ह्याच्या उत्तर भागास असलेल्या आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची त्याचबरोबर धानोरा, मुलचेरा या तालुक्यांच्या पाण्याची पातळी मात्र घटली आहे. तर दक्षिणेकडील सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, चामोर्शी या तालुक्यांची पाणी पातळी मात्र वाढली आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत दुर्गम भागात व जंगलव्याप्त भागात असलेल्या विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे. देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा या तालुक्यांमध्ये तुलनेने जंगलाचे प्रमाण कमी आहे. त्याचबरोबर शेतीसाठी पाण्याचा उपसा वाढत असल्याने भूजल पातळी कमी झाली आहे.