भूजल पातळीत ०.६४ मीटरने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:11 IST2017-11-10T00:11:44+5:302017-11-10T00:11:57+5:30

जिल्ह्यात यावर्षी जमिनीतील पाण्याची पातळी आणखी खोल गेली आहे. गेल्या पाच वर्षाच्या पाणी पातळीच्या तुलनेत यावर्षी सप्टेंबर अखेर पाण्याच्या पातळीत ०.६४ मीटरने घट झाली आहे.

Groundwater level decreases by 0.64 meters | भूजल पातळीत ०.६४ मीटरने घट

भूजल पातळीत ०.६४ मीटरने घट

ठळक मुद्देकमी पावसाचा परिणाम : सिरोंचामध्ये पाणी गेले सर्वात खोल

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात यावर्षी जमिनीतील पाण्याची पातळी आणखी खोल गेली आहे. गेल्या पाच वर्षाच्या पाणी पातळीच्या तुलनेत यावर्षी सप्टेंबर अखेर पाण्याच्या पातळीत ०.६४ मीटरने घट झाली आहे. यामुळे उन्हाळ्यात काही भागात ुपाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्याच्या सर्व क्षेत्रात मिळून ११२ निरीक्षण विहिरींमध्ये भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेने केलेल्या पाहणीत भूजल पातळीत घट झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. तरीही टंचाई आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात (आॅक्टोबर ते डिसेंबर) जिल्ह्यात कुठेही पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता नसल्याचे संबंधित यंत्रणेने स्पष्ट केले. मात्र उपलब्ध पाण्याचे स्त्रोत पुरेशा प्रमाणात नसेल तर दुसºया आणि तिसºया टप्प्यांत काही भागात पाणी टंचाई जाणवणार आहे.
जिल्ह्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान १३५४.७८ मिमी आहे. यावर्षी प्रत्यक्ष १०११.३३ मिमी पर्जन्यमान झाले आहे. म्हणजे सरासरीच्या तुलनेत २५.३५ टक्के पाऊस कमी झाला आहे. सर्वात कमी ८०९.९० मिमी पाऊस सिरोंचा तालुक्यात झाला आहे. त्यामुळे या तालुक्यात भूजल पातळी सर्वात जास्त घटली आहे.
सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक १२३५ मिमी पाऊस झाला असला तरी या तालुक्यात ०.८३ मीटरने भूजल पातळी घटली आहे.

टंचाईची परिस्थिती आटोक्यातच राहणार
शासनाच्या जीआरनुसार ५० टक्केपेक्षा कमी पाऊस झाला आणि भूजल स्तरात १ मीटरपेक्षा जास्त घट झाली असेल तर शासन दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे मानते. परंतू यावर्षी जिल्ह्यात जवळपास ७५ टक्के पाऊस झाला आहे. शिवाय भूजल स्तर १ मीटरपेक्षा जास्त घटलेला नाही. तरीही मंडळनिहाय पाऊस आणि भूजल स्तर अपेक्षेपेक्षा कमी आहे असे आढळल्यास त्यांना दुष्काळसदृश परिस्थितीची शासकीय मदत मिळू शकते. जिल्हाभरातील मंडळांचा त्याबाबतचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. तालुकानिहाय भूजल स्तरातील घट पाहता सिरोंचा २.४३ मीटर, मुलचेरा १.६२ मीटर आणि अहेरी तालुक्यात १.४५ मीटरने घट झाली आहे.

यावर्षी पाऊस कमी आल्याने भूजल स्तरात घट झाली असली तरी तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्यासारखी स्थिती नाही. जलस्त्रोत किती उपलब्ध आहेत याची जिल्हा परिषदेच्या यंत्रणेकडून तपासणी करून त्यानुसार ते टंचाई आराखडा तयार करतील.
- पी.बी.निखाडे,
वरिष्ठ भूवैज्ञानिक, गडचिरोली

Web Title: Groundwater level decreases by 0.64 meters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.