भूजल पातळीत ०.५२ मीटरने घट
By Admin | Updated: May 20, 2015 02:11 IST2015-05-20T02:11:30+5:302015-05-20T02:11:30+5:30
२०१४ च्या पावसाळ्यात सरासरी कमी पर्जन्यमान झाल्याने त्याचा सरळ परिणाम भूजल पातळीवर पडला असून जिल्ह्यातील भूजलाची पातळी सरासरी ०.५२ मीटरने घटली आहे.

भूजल पातळीत ०.५२ मीटरने घट
गडचिरोली : २०१४ च्या पावसाळ्यात सरासरी कमी पर्जन्यमान झाल्याने त्याचा सरळ परिणाम भूजल पातळीवर पडला असून जिल्ह्यातील भूजलाची पातळी सरासरी ०.५२ मीटरने घटली आहे.
भूजल पातळीचे मापन करण्यासाठी जिल्हा स्तरावर स्वतंत्र भूजल सर्वेक्षण विभाग स्थापन करण्यात आला आहे. या विभागाच्या वतीने दर तीन महिन्यांनी जिल्हाभरातील काही निवडक विहिरींचे सर्वेक्षण करून भूजल पातळी तपासली जाते. या विभागाच्या वतीने मार्च २०१५ मध्ये बाराही तालुक्यातील १९२ विहिरींची तपासणी झाली. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील १०, आरमोरी आठ, देसाईगंज सात, कुरखेडा १५, कोरची सहा, धानोरा १२, चामोर्शी ११, मुलचेरा पाच, एटापल्ली १२, अहेरी ११, भामरागड सहा व सिरोंचा तालुक्यातील नऊ विहिरींचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षात या विहिरींमधील पाण्याची सरासरी पातळी ६.५९ मीटर होती. मार्च २०१५ मध्ये पाण्याची पातळी ६.७ मीटरवर आली आहे. म्हणजेच पाण्याची पातळी ०.५२ मीटरने घटली असल्याचे निदर्शनास येते.
सर्वेक्षण करण्यात आलेल्या गडचिरोली तालुक्यातील दहा विहिरींपैकी दोन विहिरीतील पाण्याच्या पातळी घट तर आठ विहिरींतील पाण्याच्या पातळी वाढ झाली आहे. आरमोरी तालुक्यातील आठ पैकी दोन विहिरींमध्ये घट तर सहा विहिरींमध्ये वाढ झाली आहे. देसाईगंज तालुक्यातील तीन विहिरींमध्ये घट तर चार विहिरींमध्ये वाढ, कुरखेडा तालुक्यातील चार विहिरींच्या पाण्याच्या पातळी घट तर ११ मध्ये वाढ झाली आहे. कोरची तालुक्यातील सहा पैकी सर्वच विहिरींत पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. धानोरा तालुक्यातील एक, चामोर्शी तालुक्यातील दोन, अहेरी दोन, एटापल्ली तीन, सिरोंचा तालुक्यातील चार सर्वेक्षण विहिरींतील पाण्याची पातळीमात्र घटली असल्याचे दिसून येते.
जिल्ह्याच्या प्रत्येक भागात असमान प्रमाणात पाऊस पडते. त्यामुळे काही तालुक्यांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. तर काही तालुक्यांमधील मात्र ही पातळी घटली आहे. बहुतांश ठिकाणची पाणी पातळी वाढली असली तरी मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या उन्हाळ्यात सरासरी ०.५२ मीटरने पाण्याची पातळी घटली आहे. (नगर प्रतिनिधी)