किराणा, भाजीपाला दुकाने आता दुपारी ३ पर्यंतच सुरू राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:38 IST2021-04-20T04:38:00+5:302021-04-20T04:38:00+5:30
जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची वाढती संख्या लक्षात घेऊन यापूर्वी दिलेल्या आदेशामध्ये बदल केला आहे. अत्यावश्यक सेवेत ...

किराणा, भाजीपाला दुकाने आता दुपारी ३ पर्यंतच सुरू राहणार
जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची वाढती संख्या लक्षात घेऊन यापूर्वी दिलेल्या आदेशामध्ये बदल केला आहे. अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या खाद्यान्नातील किराणा मालाची दुकाने, भाजीपाल्याची दुकाने, फळ विक्रेते, दूध पुरवठा केंद्रे (दुग्धशाळा), बेकरी, मिठाईची दुकाने, पशुखाद्य व इतर सर्व प्रकारची खाद्यान्न दुकाने इत्यादी सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची अनुमती राहणार आहे. आरोग्य सेवा, रुग्णालये, मेडिकल इत्यादींना मात्र सदर वेळेचे बंधन लागू राहणार नाही. दुपारी ३ वाजेनंतर कारणांशिवाय सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला फिरता येणार नाही. अपवादात्मक परिस्थितीत औषधे घेण्याकरिता जायचे असल्यास सोबत औषधोपचाराची चिठ्ठी असणे आवश्यक राहणार आहे.
अत्यावश्यक बाबींमध्ये आता वन विभागामार्फत मंजूर असलेली वनीकरणासंदर्भातील कामे, शाळा/महाविद्यालयातील शिक्षक/प्राध्यापकांना ऑनलाइन क्लासेससाठी शाळेत उपस्थित राहण्याची मुभा या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
(बॉक्स)
येथून येणाऱ्यांना चाचणीशिवाय प्रवेश नाही
- कोरोनाग्रस्त असलेल्या केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली व उत्तराखंड या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना, ४८ तासांच्या आतील आरटीपीसीआर चाचणी करूनच गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश मिळणार आहे. जर ते पॉझिटिव्ह असतील तर त्यांना थेट रुग्णालयात जावे लागणार आहे.
(बॉक्स)
कोरोना रुग्णांसाठी १०७ इमारतींचे अधिग्रहण
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्ह्यातील विविध शासकीय व खाजगी आश्रमशाळा, वसतिगृह, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विश्रामगृह ताब्यात घेतली आहेत. रुग्णसंख्या वाढल्यास त्या ठिकाणी आरोग्य सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यामध्ये जवळपास १०७ इमारतींचा समावेश आहे. या ठिकाणी आवश्यकतेनुसार कोविड केअर सेंटर अनुषंगिक सोयीसुविधा उभारण्यात येणार आहेत.