साग, बिजा वृक्षाची अवैध तोड
By Admin | Updated: October 5, 2014 23:04 IST2014-10-05T23:04:54+5:302014-10-05T23:04:54+5:30
येथून जवळच असलेल्या अंतरंजी आणि पाथरगोटा गावातील मौल्यवान साग, बिजा झाडांची अवैध वृक्षतोड करण्यात आली. तोड केल्यानंतर २० ते २५ घनमीटरचे लाकडे गोळा करून ठेवण्यात आले आहे.

साग, बिजा वृक्षाची अवैध तोड
जोगीसाखरा : येथून जवळच असलेल्या अंतरंजी आणि पाथरगोटा गावातील मौल्यवान साग, बिजा झाडांची अवैध वृक्षतोड करण्यात आली. तोड केल्यानंतर २० ते २५ घनमीटरचे लाकडे गोळा करून ठेवण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यापासून गोळा केलेल्या या लाकडी मालास वाहतूक आदेशाची प्रतिक्षा असल्याचे समजते.
अंतरंजी आणि पाथरगोटा येथील काही शेतकऱ्यांच्या खसऱ्यावरील सागवान प्रजातीचे सरासरी १२ घनमीटर आणि बिजा प्रजातीचे १० घनमीटर लाकडे दोन्ही ठिकाणी जमा करून तसेच ठेवण्यात आले आहेत. सदर प्रत्येक लठ्ठ्यावर योग्य प्रकारे क्रमांक ठाकण्यात आले नसून हॅमर मारल्याचे निशान आढळून येत नाही. उपवनसंरक्षक वडसा यांनी सदर मालाची कोणत्याही प्रकारची शहानिशा केली नसतांनाही या लाकडी मालाला खुंटाजवळून हलविण्यात आले. वास्तविक उपवनसंरक्षकांच्या परवानगीशिवाय तोडलेल्या वृक्षांची लाकडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविता येत नाही, असा नियम आहे. मात्र मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून वृक्षांची लाकडे दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आल्याने सदर उच्च मौल्यवान प्रजातीचा लाकडी माल खासगी क्षेत्रातील आहे की, सरकारी क्षेत्रातील आहे, हे कळायला मार्ग नाही.
वनअधिनियम १९६७ नुसार सरकारी वाटपातील पट्टेदार जमिनीतील १९६७ पूर्वीच्या खसऱ्यावरील झाडांवर शेतकऱ्यांचा मालकी हक्क आहे. मात्र त्यानंतरच्या झाडावर शासनाचे हक्क असल्याचे नमूद आहे. शेतकऱ्याला वृक्षतोडीसाठी परवानगी घ्यावी लागते. २५ टक्के कराचा भरणा करून झाडाची खरेदी केली जाते. मात्र वनाधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे अवैध वृक्षतोड सुरू आहे. (वार्ताहर)