ग्रामसेवकांचे बीडीओ विरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2017 01:08 IST2017-04-07T01:08:29+5:302017-04-07T01:08:29+5:30
धानोरा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी डी. पी. सपाटे हे असभ्य वर्तवणूक करून मानसिक त्रास देत ...

ग्रामसेवकांचे बीडीओ विरोधात आंदोलन
दुसरा टप्पा : २० मे पर्यंत कारवाई न झाल्यास असहकार आंदोलनाचा इशारा
धानोरा : धानोरा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी डी. पी. सपाटे हे असभ्य वर्तवणूक करून मानसिक त्रास देत असल्याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन धानोरा शाखेच्या वतीने करण्यात आली. दरम्यान ग्रामसेवक संघटनेच्या वतीने एक दिवसीय असहकार आंदोलन गुरूवारी करण्यात आले.
या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष आर. बी. बोरकुटे, उपाध्यक्ष एस. बी. संतोषवार, सचिव एस. के. बोरकर, कार्याध्यक्ष जे. एस. मेश्राम, कोषाध्यक्ष पी. एस. बुराडे यांनी केले. यावेळी पंचायत समितीसमोर धरणेही देण्यात आले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात गट विकास अधिकारी डी. पी. सपाटे धानोरा पंचायत समितीमध्ये रूजू झाल्यापासून ग्रामपंचायस्तरावर काम करीत असताना अवास्तव प्रशासकीय अडचणी आणत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या विकासकामांवर व ग्रामसेवकाच्या मानसिकतेवर विपरित परिणाम झाला आहे. धानोरा तालुका दुर्गम असून ग्रामसेवक आपली जबाबदारी व कर्तव्य नियमित पार पाडत असताना बीडीओंकडून कोणतेही सहकार्य मिळत नाही. उलट एकेरी भाषेत बोलणे, कार्यवाहीची धमकी देणे आदी प्रकार मानसिक त्रास सुरू आहे व ग्रामसेवकांची आर्थिक पिळवणूकही होत आहे, असे ग्रामसेवक संघटनेने म्हटले आहे. यापुढे ३ जानेवारीपासून मासिक, पाक्षिक सभांवर बहिष्कार टाकण्यात येणार असून ग्रामपंचायतीचे कामकाज सुरू राहिल. तसेच लेखा परीक्षण, चौकशी, दप्तरी तपासणी व अहवाल देणे बंद करण्यात आले आहे. २० मे पर्यंत प्रश्न मार्गी न लागल्या सर्व योजनांचे काम बंद करून असहकार आंदोलन सुरू करण्यात येईल, अशी माहिती ग्रामसेवक संघटनेने दिली आहे. या प्रकरणी संवर्ग विकास अधिकारी डी. पी. सपाटे यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करण्यात आला. ते मिटींगमध्ये असल्याने त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे त्यांची बाजू जाणून घेता आली नाही. (तालुका प्रतिनिधी)