४१ जागांसाठी ग्रा.पं. निवडणूक
By Admin | Updated: October 30, 2014 22:51 IST2014-10-30T22:51:04+5:302014-10-30T22:51:04+5:30
राज्य निवडणूक आयोगाने २७ आॅक्टोबर २०१४ रोजी पत्र काढून राज्यभरासह जिल्ह्यातील डिसेंबर २०१४ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक, पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

४१ जागांसाठी ग्रा.पं. निवडणूक
गडचिरोली : राज्य निवडणूक आयोगाने २७ आॅक्टोबर २०१४ रोजी पत्र काढून राज्यभरासह जिल्ह्यातील डिसेंबर २०१४ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक, पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार जिल्ह्यात कुरखेडा तालुक्यातील १० ग्रामपंचायतीमध्ये १६ प्रभागात ३४ जागांसाठी पोट निवडणूक होणार आहे. तसेच धानोरा तालुक्यातील कोंदावाही या एकमेव ग्रामपंचायतीमध्ये तीन प्रभागातील सात जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४६७ ग्रामपंचायती आहेत. यापैकी एका ग्रामपंचायतीची मुदत डिसेंबर २०१४ मध्ये संपणार आहे. तर ग्रा.पं. सदस्यांच्या जागा रिक्त झालेल्या कुरखेडा तालुक्यातील १० ग्रामपंचायतीमध्ये २३ नोव्हेंबर रोजी पोट निवडणुका घेण्यात येणार आहे. धानोरा तालुक्यातील कोंदावाही या एकमेव ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार असून या ग्रामपंचायतीमध्ये तीन प्रभागातील सात सदस्यांच्या जागांसाठी सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. कुरखेडा तालुक्यातील पुराडा, शिवणी, दादापूर, तळेगाव, धनेगाव, आंधळी (सोनसरी), घाटी, कातवाडा, रानवाही, खोब्रामेंढा आदी १० ग्रामपंचायतीमध्ये १६ प्रभागातील ३४ जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त जागांसाठी पोट निवडणूक होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी जिल्हा व ग्रामपंचायत प्रशासनाने सुरू केली आहे. आतापासूनच मतदार यादी, छायाचित्र आदींचे काम सुरू करण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ३ नोव्हेंबरपासून नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. प्राप्त झालेल्या नाम निर्देशन पत्राची छाननी १० नोव्हेंबर २०१४ रोजी होईल. त्यानंतर नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची प्रक्रिया आटोपल्यानंतर निवडणूक विभागामार्फत नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप होणार आहे. २३ नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे, २४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. आरक्षित जागांसाठी निवडणूक लढविणाऱ्या अनुसूचित जमाती, जाती प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र जोडणे निवडणूक आयोगाने बंधनकारक केले आहे. विधानसभा निवडणूक आटोपल्यानंतर ग्रा.पं. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे कर्मचारी कामाला लागले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)