तेंदू लिलावात ग्रामकोष समितीचा मनमानी कारभार
By Admin | Updated: April 21, 2016 01:54 IST2016-04-21T01:54:48+5:302016-04-21T01:54:48+5:30
पेसा अंतर्गत तेंदू लिलाव करण्याचा अधिकार शासनाने ग्रामसभेला दिला आहे. यामुळे अनेक ग्रामपंचायतींना लाखो रूपयांचा महसूल मिळत आहे,

तेंदू लिलावात ग्रामकोष समितीचा मनमानी कारभार
गोंधळ : न्यायालयात जाण्याची तयारी
कमलापूर : पेसा अंतर्गत तेंदू लिलाव करण्याचा अधिकार शासनाने ग्रामसभेला दिला आहे. यामुळे अनेक ग्रामपंचायतींना लाखो रूपयांचा महसूल मिळत आहे, असे असताना कमलापूर क्षेत्रातील अनेक ग्रामपंचायतीच्या ग्रामकोष समितीने लिलाव करताना मनमानी चालविली आहे. गावातील नागरिक कधीच तेंदूपानांना जास्त भाव मिळत असताना विरोध करीत नाही. त्यामुळे लिलाव करताना व्यापक प्रसिध्दी करून अनेक कंत्राटदारांना या प्रक्रियेत सहभागी करून घेणे आवश्यक आहे. परंतू कमलापूर परिसरातील बऱ्याच ग्रामपंचायतींनी कुठलीही जाहिरात न देता कंत्राटदारांशी संगनमत करून ग्रामसभांचे ठराव पारित केले आहे व परस्पर तेंदू युनिटाचा लिलाव झाल्याचा ठरावही घेतला आहे. तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना व जनतेला मिळणाऱ्या अधिक रक्कमेचा वाटा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या खिशात जात असल्याची चर्चा या परिसरात आहे. रेपनपल्ली ग्रामपंचायतीत बुधवारी जनतेला माहिती न देताच सकाळी १० वाजताच्या अगोदरच लिलाव प्रक्रिया आटोपण्यात आली. कंत्राटदारांनीही या संदर्भात नाराजी व्यक्त केली असून या प्रकरणी आपण न्यायालयात जाण्याची तयारी करीत आहो, अशी माहिती कंत्राटदारांनी लोकमतशी बोलताना दिली. एकूणच तेंदू लिलाव प्रक्रियेच्या पारदर्शकतेला मुठमाती देण्याचे काम सुरू आहे. (वार्ताहर)